gogate-college-autonomous-logo

मनातील अस्पष्ट स्वप्नांवर पूर्णतः लक्ष केंद्रित करा : डॉ अपर्णा महाजन

जीवनामध्ये संधी शोधण्याची क्षमता वाढवा. आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी परिश्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपल्याला कोणते ध्येय साधायचे आहे हे निश्चितपणे ठरवा, पण त्या ध्येयापर्यंत प्रवास होण्याच्या दृष्टीने प्रत्येक टप्प्यातून मिळणारा अनुभव साठवत जावा.त्यामुळे ध्येय ठरवा योजना आखा आणि त्यानुसार कृती करा असे प्रतिपादन डॉ.अपर्णा महाजन यांनी केले.

त्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील डॉ ज शं केळकर सभागृहात आयोजित विद्यार्थी आणि स्वयंप्रेरणा – एक संवाद या कार्यशाळेत बोलत होत्या. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील जीवन कौशल्य विकसन समिती यांच्यावतीने दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयातीलच डॉ. ज शं. केळकर सेमिनार कक्षात ‘विद्यार्थी आणि स्वयंप्रेरणा: एक संवाद’ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.अपर्णा महाजन उपस्थित होत्या. विद्यार्थी, त्यांचे ध्येय आणि त्यानुसार त्यांना होणारी स्वयंप्रेरणा या संबंधित सर्व गोष्टींवर डॉ.अपर्णा महाजन यांनी विशेष भर दिला. आपल्या मार्गदर्शनात बोलताना त्या म्हणाल्या की ध्येय ठरवण्याआधी आपली क्षमता आणि आपल्यातील उणिवा जाणून घेणे खूप गरजेचे आहे .

त्या पुढे म्हणाल्या की,आपलं ध्येय हे नेमकं,मोजून ठरवलेलं,साध्य करण्यायोग्य आणि आपल्या आवडीची,आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टीशी संबंधित आणि वेळेचे बंधन असलेलं अशा स्वरूपाचे असावे .ज्यामुळे ध्येय साध्य करण्याच्या प्रवासात कधीही ताण उद्भवत नाही .

यानंतर या कार्यशाळेत अध्यक्षीय मनोगतात बोलताना कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी सतत कार्य मग्न असणे गरजेचे आहे. थोडक्यात सतत काहीतरी शिकणं अत्यंत आवश्यक आहे जीवनात येणाऱ्या प्रत्येक टप्प्यातून काही ना काही अनुभव आणि शिक्षण मिळतच असतं ते ओळखण्याची क्षमता प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये येणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी स्वतःच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी झटणं गरजेचे आहे.

या कार्यशाळेच प्रास्ताविक जीवन कौशल्य विकसन समितीचे समन्वयक प्रा. वासुदेव आठल्ये यांनी केले. या कार्यशाळेला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी पी कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.अतुल पित्रे, डॉ. निधी पटवर्धन, प्रा.शिवराज गोपाळे, प्रा. कृष्णात खांडेकर, आणि प्रा. स्नेह शिवलकर यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला विविध विभागातील प्राध्यापक तसेच बहुसंखेने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन मनस्वी नाटेकर आणि आभार प्रदर्शन सेजल तांबे हिने केले.

Comments are closed.