gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. मीरा माईणकर यांचे व्याख्यान संपन्न

meera-mainkar-prog

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे विभागातील माजी विद्यार्थिनी डॉ. मीरा माईणकर यांच्या व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ‘Preserv One, Preserv All’ या विषयावर सदर व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रमुख व्याख्यात्या डॉ. मीरा माईणकर आणि माजी गणित विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख प्रा. दिवाकर कारवंजे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी तर पाहुण्यांची ओळख डॉ. राजीव सप्रे यांनी करून दिली. यानंतर प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्रमुख व्याख्यात्या डॉ. मीरा माईणकर या सध्या सेंट्रल मिशिगन युनिव्हर्सिटी, अमेरिका येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. आपल्या व्याख्यानात त्यांनी गणितातील क्लिष्ट संकल्पना अगदी सोप्या पध्दतीने समजावून सांगितल्या. त्याचबरोबर भारतातील १२वी पर्यंतचे विद्यार्थी हे परदेशी मुलांपेक्षाही कसे हुशार असतात परंतु नंतर त्यांची मेहनत कशी कमी पडते याबद्दल माहिती दिली. व्याख्यानाच्या अखेरच्या टप्प्यात भारताबाहेर शिक्षण घेण्यासाठी कशा संधी उपलब्ध आहेत, पीएच.डी.साठी कशा पध्दतीने प्रवेश घेतला जाऊ शकतो याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

या व्याख्यानासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक आणि शहरातील गणितप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सदर व्याख्यान उत्तमरित्या संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. उमा जोशी यांनी केले.

meera-mainkar-prog
Comments are closed.