gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २३ ते २६ जुलै दरम्यान जागतिक खारफुटी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिवर्षी दि. २६ जुलै रोजी जागतिकस्तरावर ‘खारफुटी दिन’ साजरा केला जातो. खारफुटी परिसंस्था, जमीन आणि समुद्र यांच्या सीमेवरील विशेष, नेत्रदीपक आणि विपुल परिसंस्था आहे. खारफुटी परिसंस्था वादळ, त्सुनामी, समुद्राची वाढती पातळी आणि धूप यापासून नैसर्गिक तटीय संरक्षण करतात. एक अद्वितीय, विशेष आणि असुरक्षित परिसंस्था म्हणून खारफुटी परिसंस्थेच्या महत्वाविषयी जागरूकता वाढविणे आणि खारफुटी संवर्धनासाठी दि. २६ जुलै हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभागातर्फे कांदळवन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक खारफुटी दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आहोजन करण्यात येणार आहे. प्रतिवर्षी वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभागातर्फे खारफुटी दिनानिमित्त प्रदर्शन, व्याख्याने, फोटोग्राफी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्या जातात.

विद्यमान वर्षी कांदळवन कक्ष आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ जुलै ते २६ जुलै दरम्यान ‘मंगल-उत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. दि. २३ रोजी रनपार येथे खारफुटी परिसंस्थेचे निरीक्षण करण्याकरिता क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ जुलै रोजी खारफुटी संदर्भातील फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच खारफुटी दिनानिमित वनस्पतीशास्त्र विभागात विभाग प्रमुख प्रा. शरद आपटे हे विद्यार्थ्यांना ‘खारफुटी परिसंस्था’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कांदळवन कक्षातील मान्यवरांचे व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले आहे. दि. २६ जुलै रोजी खारफुटी दिनानिमित्त विविध खारफुटी वनस्पती आणि तेथील प्राणी व सूक्ष्मजीव यांचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विभागात सकाळी ११.०० ते दुपारी ०३.०० या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.

सदर कार्यक्रमांचा सर्व विद्यार्थी आणि शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.