gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालायामध्ये डॉ. बावडेकर व्याख्यानमालेचे ३३वे पुष्प संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. वि. के. बावडेकर व्याख्यानमालेचे ३३ वे पुष्प नुकतेच महाविद्यालयात संपन्न झाले. गोवा विद्यापीठाचे शास्त्र शाखेचे डीन डॉ. जनार्दनम यांनी ‘वनस्पती, मनुष्य प्राणी आणि पर्यावरणशास्त्र यांमधील सहसबंध व त्यांचे पर्यावरणावर होणारे परिणाम’ यावर उपयुक्त असे मार्गदर्शन केले.

परदेशी वनस्पतींचा आपल्या खाद्यसंस्कृतीत झालेला अंतर्भाव आणि त्याचा आपल्या शेतीवर व जीवनशैलीवर होणारा परिणाम यांचा ओघवत्या शैलीत आढावा घेतला. तसेच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व तो थांबविण्यासाठी तातडीच्या उपाययोजना यांचे महत्व आपल्या ओघवत्या शैलीत श्रोत्यांना पटवून दिले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी माजी प्राचार्य डॉ. बावडेकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. १९४५ यावर्षी रसायनशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झालेले डॉ. बावडेकर १९७६ यावर्षी प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. उत्कृष्ट शिक्षक, प्रशिक्षक, सहृदयी व्यक्ती आणि उत्तम प्रशासक म्हणून गौरविलेले डॉ. बावडेकर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घडवणे हेच ध्येय त्यांनी आपल्या जीवनप्रवासात जपले. निवृत्तीनंतर पुणे येथील आघारकर संस्थेमध्ये पीएच.डी. करून त्यांनी आपली संशोधनाची वृत्ती जपली; असे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

प्रा. शरद आपटे यांनी प्रमुख वक्ते डॉ. जनार्दनम यांचा वनस्पतिशास्त्र विषयातील उल्लेखनीय संशोधनाचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. तेजश्री भावे यांनी केले.

सदर कार्यक्रमाला सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, रत्नागिरी शहरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.

h
h
h
Comments are closed.