gogate-college-autonomous-logo

“उत्तम निवेदकाची समाजाला गरज, ती भागवण्याची जबाबदारी आपली!” – विघ्नेश जोशी ; गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिनेता विघ्नेश जोशी यांची सूत्रसंचालनाची कार्यशाळा संपन्न

“दोन U सूत्रसंचालकासाठी महत्त्वाचे असतात, पहिला U-अपडेट युवरसेल्फ, दुसरा U-अपग्रेड युवरसेल्फ! याचबरोबर भाषाप्रभुत्व, निरीक्षण, पाठांतर, वाचन, शब्दसंग्रह, शब्दांचे जोडकाम, भान, हजरजबाबीपणा, मेहनत, सराव हे गुण सूत्रसंचालकाकडे हवेत.” असे उद्गार प्रसिद्ध अभिनेता आणि सूत्रसंचालक विघ्नेश जोशी यांनी विद्यार्थ्यांसमोर काढले,
औचित्य होते, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळ आणि जीवन कौशल्य विकसन समितीतर्फे आयोजित केलेल्या “सूत्रसंचालन : कला आणि व्यवसाय संधी” या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.

व्यासपीठावर कलाशाखा उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, मराठी वाङ्मय मंडळ समन्वयक शिवराज गोपाळे आणि जीवन कौशल्य विकसन समिती समन्वयक प्रा. वासुदेव आठल्ये उपस्थितीत होते. एकूण ८५ विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.

महाविद्यालयाचे वाङ्मय मंडळ आणि जीवन कौशल्य विकसन समिती विद्यार्थ्यांमध्ये कला- कौशल्य वृद्धिंगत करण्याकरता विविध उपक्रम घेत असते. त्यातील उपक्रमाचा एक भाग म्हणजे ही कार्यशाळा होती. यात आवाज कसा लावावा, संभाव्य प्रेक्षकवर्ग ओळखून कुणासाठी कुठले निवेदन पॅटर्न ठरवावे, शिष्टाचार कसे पाळावेत आदी विषयांवर चर्चा केली गेली. कु.स्वराली कनावजे या विद्यार्थिनीकडून आभार प्रदर्शनाचे प्रात्यक्षिकही करवून घेतले गेले. ‘माहिती’ आणि ‘मनोरंजन’ या दोन गोष्टींवर भर देऊन सूत्रसंचालकाने बहुश्रुत कसे असावे याविषयी विघ्नेश जोशी यांनी मनमोकळी मांडणी केली. प्रमुख वक्त्यांचा परिचय आणि समितीतर्फे आभारप्रदर्शन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा शिवलकर यांनी केले. प्रा. कृष्णात खांडेकर, प्रा. प्रदीप कदम यांचे विशेष सहकार्य लाभले. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.