gogate-college-autonomous-logo

प्रत्यक्ष सतारवादनातून उलगडले कलेचे मानवी जीवनातील महत्त्व ; ‘रागा टू रुरल इंडिया’ उपक्रमा-अंतर्गत श्री. विदुर महाजन यांचा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कार्यक्रम

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील फिल्म क्लब आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी श्री. विदुर महाजन यांचा’कलेचे मानवी जीवनातील स्थान’ या विषयावरील संवाद आणि प्रत्यक्ष सतार वादन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री. विदुर महाजन गेली तीस हून अधिक वर्षे सतार वादन क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आजवर सतार वादनाचे ८०० हून अधिक कार्यक्रम केले आहेत. उस्ताद खां , उस्ताद शाहीद परवेझ, किशोरीताई आमोणकर यांसारख्या दिग्गज व्यक्तींकडून सांगीतिक शिक्षण घेतलेल्या श्री. महाजन यांनी राग-संगीताचा हा वारसा भारतातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचावा या उद्देशाने गेल्या दहा वर्षांपासून ‘रागा टू रुरल इंडिया’ हा उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामीण तसेच निम शहरी भागांत प्रत्यक्ष सतार वादन करून ,‘सतार’ हे वाद्य तसेच भारतीय राग-संगीत याची ओळख मुख्यत्वे शाळा-महाविद्यालयातील विद्य्रार्थ्यांना ते करून देतात.

याच उपक्रमाचा भाग म्हणून दि. ८ डिसेंबर रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात त्यांनी प्रत्यक्ष सतार वादन केले तसेच कलेचे मानवी जीवनातील स्थान किती श्रेष्ठ आहे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘विविध ताण-तणाव , नकारात्मक भाव-भावना यांचे मनावरील ओझे उतरवण्याचे काम कोणतीही कला करते’ हे त्यांचे मत प्रत्यक्ष सतार वादनातून विविध रागांची उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. एक तासाहून अधिक काळ चाललेल्या या कलाविष्काराने सर्व उपस्थित श्रोते अतिशय मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. महाजन यांनी, श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अतिशय दिलखुलास पणे उत्तरे दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी भूषविले. कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्र गोस्वामी , जी.जे.सी. फिल्म क्लब च्या समन्वयक डॉ. निधी पटवर्धन , सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ. आनंद आंबेकर , फिल्म क्लबचे सर्व शिक्षक प्रतिनिधी , विविध विभागांतील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली .

Comments are closed.