gogate-college-autonomous-logo

‘निरामय आणि चिरकाल आनंदाचा ठेवा म्हणजे साहित्य’- डॉ. निलांबरी कुलकर्णी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ऑनलाईन व्याख्यान संपन्न

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमांतर्गत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी विभागाने ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात ‘साहित्याने मला काय दिले?’ या विषयावर डॉ. निलांबरी कुलकर्णी यांनी दि. २५ जानेवारी २०२० रोजी साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि रसिकांशी संवाद साधला.

राम निरंजन झुनझुनवाला महाविद्यालय, घाटकोपर, मुंबई येथे मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या डॉ. निलांबरी कुलकर्णी यांनी ‘साहित्याने आपल्याला काय दिले, साहित्याने लहानपणापासून आपल्याला कसे समृद्ध केले हे श्यामची आई, कोल्हाट्याचे पोर, प्रकाश संत यांचे साहित्य तसेच नंतर वाचलेले वैचारिक साहित्य यांच्या आधारे कथन केले. साहित्याचे विविध पैलू आपल्या व्याख्यानात त्यांनी मांडले. हे पैलू उलगडताना साहित्य कोणत्याही उपदेशाचा आव न आणता आपल्याला शिकवत असते. नैतिकता प्रामाणिकता ही जीवनमूल्ये साहित्य आपल्यात रुजवते. साहित्य संवेदनशीलता बहाल करते. मानवतावादाची भूमिका, प्रेम आणि समस्त मानवजातीची करुणा साहित्य दाखवते असे प्रतिपादन केले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना आजवर वाचलेल्या पुस्तकांचे संदर्भ देत साहित्य निसर्गाची काळजी घ्यायला शिकवते. साहित्याने अनुभवाच्या कक्षा रुंदावतात, माणूस सजग होतो तो साहित्यानेच. इतके नव्हे तर एखाद्या विषयाची मांडणी तर्कशुद्ध पद्धतीने कशी करायची, विश्लेषण कसे करायचे याचे ज्ञान देखील साहित्य देते हे विद्यार्थ्यांना सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. सदर कार्यक्रमात मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, प्रा. सीमा वीर आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

Comments are closed.