gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १५ ते १७ एप्रिल दरम्यान राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन

रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात १२वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन आयोजित करण्यात येत आहे. राज्यस्तरावर कार्यरत असलेल्या राज्य खगोल अभ्यासक मंडळाच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत राज्यभरातून बहुसंख्येने खगोलप्रेमी उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस चालणार्‍या या उपक्रमात दिवसभरात व्याख्याने आणि सायंकाळी आकाशदर्शन कार्यक्रमाचा समावेश असणार आहे.

दि. १५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता उद्घाटनासाठी नाम. उदयजी सामंत, उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री रत्नागिरी-रायगड जिल्हा आणि प्रख्यात खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते श्री. दा. कृ. सोमण यांची उपस्थिती लाभणार आहे. श्री. दा. कृ. सोमण हे लोकमान्य टिळक यांनी केलेल्या खगोल गणितातील संशोधन आणि योगदांनाबद्दल बोलून या संमेलनाची सुरुवात करणार आहेत. आयुका, पुणे येथील श्री. समीर धुरडे चंद्राविषयी मनोरंजक महितीचा पट उलगडणार आहेत. आयुकाचेच श्री. तुषार पुरोहित दुर्बिणीशी हितगुज या विषयी संवाद साधतील तर आयसर, पुणेच्या श्रीम. सोनल थोरवे आकाश निरीक्षणविषयक बारकावे सांगतील.

दि. १६ आणि १७ एप्रिल रोजी सुद्धा अशाच मनोरंजक आणि माहितीपूर्ण व्याख्यानांची मेजवानी असणार आहे. मुंबई येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि उल्कापात अभ्यासक श्री. भारत अडुर, लोकप्रिय खगोल शिक्षक श्री. हेमंत मोने, संभाजीनगर येथील सौरडाग अभ्यासक श्री. श्रीनिवास औंधकर असे मान्यवरही उपस्थितांना मार्गदर्शन करतील. खोडद येथील रेडियो दुर्बिणीचे शास्त्रज्ञ श्री. सुधीर फाकटकर हेही नव्याने भारतीय अंतराळ मोहिमांविषयी सांगतील.

दोन्ही दिवस सायंकाळी आकाशनिरीक्षण सत्रे संमेलनात सहभागी झालेल्या व्यक्तींसाठी असतील. अधिक महितीसाठी प्रा. बाबासाहेब सुतार; मोबा. ७७३८४५८१८५, प्रा. निशा केळकर; मोबा. ९४०५०७२३७६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.