gogate-college-autonomous-logo

गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३२व्या जयंती दिनानिमित्त अभिवादन

गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३२ व्या जयंती दिनानिमित्त अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून गोगटे – जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी समारंभ समितीप्रमुख प्रा. शिवाजी उकरंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक समाजशास्त्रज्ञ, वंचित-बहुजनांचे दु:ख, वेदना ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’ या वृत्तपत्रातून बहुआयामाने मांडणारे पत्रकार, अर्थतज्ज्ञ, समाजसुधारक, जलनीतितज्ज्ञ, संविधानाचे निर्माते अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकून आधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी केलेल्या कार्याची महती उपस्थितांसमोर मांडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी कुलकर्णी होते. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील थोर नेते होते. वाचन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवडता छंद होता. विद्यार्थांनीही त्यांचा हा आदर्श घेऊन वाचन केले पाहिजे या हेतूने आपण आजचा हा अभिवादन कार्यक्रम ग्रंथालयातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन कक्षात आयोजित केला आहे. आपले संपूर्ण आयुष्य समाजातील दीन-दलितांच्या उद्धारासाठी खर्च करून राज्यघटनेच्या माध्यमातून समाजात समता, न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असे ते पुढे म्हणाले.

याप्रसंगी ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसेच त्यांच्या जीवनावर आधारित विविध लेखकांनी लिहिलेल्या ग्रंथांचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य प्रा. डॉ. मकरंद साखळकर, कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या अनुक्रमे प्रा.डॉ. चित्रा गोस्वामी, प्रा. डॉ. यास्मिन आवटे, प्रा. डॉ. अपर्णा कुलकर्णी, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. चिंतामणी दामले, पर्यावेक्षिका प्रा. अस्मिता कुलकर्णी, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, श्री. प्रसाद गवाणकर, विविध विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी उकरंडे यांनी तर आभारप्रदर्शन ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी केले.

Comments are closed.