gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘कालिदास दिन’ कार्यक्रम संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘कालिदास दिन’ कार्यक्रम संपन्न

दरवर्षी आषाढ शुद्ध प्रतिपदेला सर्वत्र कालिदासाच्या साहित्याचा गौरव करून कालिदास दिन साजरा केला जातो. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातही दरवर्षी कालिदास दिन कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यानिमित्ताने यावर्षी दि. २३ जून २०२३ रोजी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत विषयात एम्.ए. पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले विचार व्यक्त करतात. यावर्षी ही संधी सुखदा ताटके, प्रियांका ढोकरे आणि स्वरूप काणे या विद्यार्थ्यांनी घेतली आणि आपले कालिदासाविषयीचे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात द्वितीयवर्षाच्या विद्यार्थिनी कु. कल्पजा जोगळेकर आणि कु. मीरा काळे यांनी कालिदासाच्या साहित्यातील निवडक श्लोक गायनाने केली. त्यानंतर सर्व उपस्थितांचे स्वागत संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत या विद्यार्थ्यांचा परिचय आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील कालिदास दिनाची परंपरा याविषयी प्रा. जयंत अभ्यंकर यांनी माहिती दिली कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी संस्कृतचा आणि संशोधनाचा वारसा पुढे न्यावा. त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणामधील कौशल्याधारित शिक्षणाची संधी प्राप्त करावी असे आवाहन केले.

मुख्य कार्यक्रमात सुखदा ताटके हिने कुमारसंभावातील निसर्गवर्णनाचा अभ्यास करताना त्यातील नद्या, पर्वत व विविध नैसर्गिक घटकांचा परिचय करून दिला. प्रियांका ढोकरे हिने कालिदासाची नाटके, महाकाव्य, लघुकाव्य यातील निवडक संदर्भ दाखवत कालिदासाचा भूगोलाचा अभ्यास स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला तर स्वरूप काणे याने कालिदासाच्या मेघदूतातील निवडक संदर्भ देत सध्याच्या भौगोलिक परिस्थितीशी कालिदासाच्या विचारातील असलेले साम्य अभ्यासण्याचा प्रयत्न केला.

कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात प्रा. स्नेहा शिवलकर यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून आभार प्रदर्शन केले आणि शांतिमंत्राने या कार्यक्रमाची सांगता झाली. तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कुमारी गौरी सावंत हिने सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, संस्कृतचे विद्यार्थी उपस्थित होते.

Comments are closed.