gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कालिदास दिन साजरा

प्रतिवर्षाप्रमाणे सर्वत्र असलेल्या परंपरेनुसार यावर्षीही आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी दि. ३ जुलै रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत विभागाच्यावतीने विविध उपक्रमांनी ‘कालिदास दिन’ साजरा करण्यात आला.

या निमित्ताने महाविद्यालयाच्या कै. डॉ. ज. शं. केळकर सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात संस्कृत विभागाची माजी विद्यार्थिनी प्राजक्ता मुसळे-जोशी हिचे रघुवंशावर आधारित ‘क इह राघुकारे न रमते’ या विषयावर व्याख्यान झाले. रघुवंशाचा परिचय करून देताना राघुराजाची कथा व त्याचे विशेष विद्यार्थ्यांसमोर उलगडले. त्याचबरोबर कालिदासाच्या शैलीचाही आढावा घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कला शाखेच्या उपप्राचार्या आणि संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी कालीदासदिनाच्या परंपरा व महाविद्यालयातील कालिदासदिनाचे वैशिष्ट्य सांगून संस्कृत विभागाच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती देऊन त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी रघुवंशावर आधारित ‘रघुवंश परिचय’ या विद्यमान वर्षीच्या ‘गीर्वाण कौमुदी’ या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन संपन्न झाले. गीर्वाण कौमुदी हा अंक तृतीय वर्षाच्या संस्कृत विभागाच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण संस्कृतमध्ये लिहिला आहे. या अंकाविषयी माहिती सीमंतिनी जोशी हिने विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रमाचा समारोप प्रा. जयंत अभ्यंकर यांनी केला आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय संस्कृतमधून अक्षय नवरे याने करून दिला. कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये प्रा. स्नेहा शिवलकर आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला संस्कृत विभागाचे आणि संस्कृतची आवड असणारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते.

Comments are closed.