gogate-college

‘’साहित्य जगण्याला आधार देते’’ – कादंबरीकार कृष्णात खोत गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाङ्मय मंडळाचे उदघाटन संपन्न

‘जनतेचा खरा आधार साहित्यिक असतो. जनतेच्या पाठी नेहमी लेखक असतो; तो सामान्यांचे जगणे मांडतो आणि असे साहित्य जगण्याला आधार देते.’ असे उद्गार प्रसिद्ध साहित्यिक श्री. कृष्णात खोत यांनी काढले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाच्या उदघाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत साहित्याची निर्मिती प्रक्रिया, साहित्यिक निर्मितीविश्वातला त्यांच्या प्रवास विद्यार्थ्यांना सविस्तरपणे कथन केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रसिद्ध साहित्यिक कृष्णात खोत यांच्या शुभ हस्ते ‘साहित्य सौरभ’ या भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. गोपाळे यांनी महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन नियोजित कार्यक्रमांची रूपरेषा विशद केली. याप्रसंगी विद्यापीठ युवा संसद स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांकाची पारितोषिव विजेती विद्यार्थींनी कु. प्रिया पेडणेकर आणि मार्गदर्शक तसेच महाविद्यालयाच्या वक्तृत्व आणि वादविवाद समितीचे समन्वयक प्रा. जयंत अभ्यंकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महाविद्यालयाचे वाङ्मय मंडळ विविध साहित्यविषयक उपक्रम नेहमी आयोजित करत असते. या सर्व उपक्रमांचा औपचारिक शुभारंभ प्रसिद्ध कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाङ्मय मंडळ प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कु. जागृती महाडिक या विद्यार्थिनीने केले. सदर कार्यक्रमाला प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती.

Comments are closed.