gogate-college-autonomous-logo

दिल्ल्ली येथे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रिया पेडणेकरचा ‘युवा संसद’ स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील गौरव

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे मुंबई विद्यापीठ येथे झालेल्या १४व्या युवा संसद स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. प्रिया शांताराम पेडणेकर हिने उत्कृष्ट प्रदर्शन करीत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले होते. मुंबई विद्यापीठाच्या या चमूची निवड राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरिता झाली होती. विद्यापीच्या दीक्षांत सभागृहात संपन्न झालेल्या स्पर्धेत कु. प्रिया हिने उत्कृष्ट प्रदर्शन करीत राष्ट्रीय स्तरावरही द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. मुंबईच्या संघात सहभागी होऊन पारितोषिक पात्र ठरलेली कु. प्रिया ही मुंबई बाहेरील एकमेव विद्यार्थिनी आहे.कु. प्रिया ही महाविद्यालयाच्या पदव्यूत्तर द्वितीय वर्षात अध्ययन करत असून ती इंग्रजी विभागाची विद्यार्थिनी आहे. विजेत्यांना संसदीय कार्य मंत्री श्री. राम मेघवाल यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दिल्ली येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वक्तृत्व व वादविवाद समितीचे समन्वयक प्रा. जयंत अभ्यंकर हेही या पारितोषिक समारंभात सहभागी झाले होते.

कु. प्रिया हिने यापूर्वी विद्यापीठ आणि राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके प्राप्त केली असून मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि उर्दू अशा पाचही भाषांशी प्रियाचा चांगलाच परिचय आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन संसदीय कामकाजाचा जवळून अभ्यास करता आला, लोकशाही मूल्यांची जोपासना करण्याचे भान या स्पर्धेमुळे प्राप्त झाल्याचे या सुयशानंतर कु. प्रियाने आवर्जून सांगितले. तसेच या कार्यक्रमामुळे देशाच्या संसदीय कामकाजाशी जवळीक झाल्याचे तिने सांगितले.

कु. प्रिया हिच्या राष्ट्रीय सुयशाबद्दल व मार्गदर्शक प्रा. जयंत अभ्यंकर यांचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.