gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे ‘चाईल्ड लाईन-१०९८’ विषयक जनजागृती अभियान संपन्न

gjc-ncc-unit-mar-22

महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या अनुदानातून ‘चाईल्ड लाईन-१०९८’ हा शासकीय प्रकल्प एम. एस. नाईक फाउंडेशन, रत्नागिरी यांच्या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात दि. ५ मे २०११ पासून राबवला जातो. भारत सरकारच्या या उपक्रमाची माहिती व बालकांच्या विविध समस्यांबद्दल जनजागृती व्हावी म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) विभागातर्फे छात्रांसाठी एम. एस. नाईक फाउंडेशन, रत्नागिरी यांच्या चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक सौ. अन्वी शिंदे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी छात्रांना मार्गदर्शन करताना “व्यसनाधीनता, बालभिक्षेकरी, बालविवाह, बालकांचे लैंगिक शोषण या सामाजिक समस्यांच्या निर्मुलनासाठी शासनातर्फे व स्वयंसेवी संस्थांमार्फत अनेक योजना व उपक्रम राबवले जातात, यामध्ये लोकसहभागाची व्यापक प्रमाणात आज गरज असून एन.सी.सी.छात्रांनी या मोहिमेत सक्रीय सहभागी होऊन देश सेवेतील आपले कर्तव्य पार पाडावे” असे आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या सौ.अन्वी शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समस्यांग्रस्त बालकांसाठी काम करताना आलेले अनुभव सांगितले. चाईल्ड लाईन-१०९८ ही काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या ० ते १९ वयोगटातील मुला-मुलींकरता २४ तास कार्यरत असणारी मोफत सेवा आहे. व्यसनमुक्ती, बालमजुरी, बालविवाह, लैंगिक शोषण अशा अनेक क्षेत्रामध्ये हि संस्था मुलांचे समुपदेशन व मार्गदर्शन, कायदेशीर मदत, पुनर्वसन अशी विविध कार्ये करते. या समाजसेवी कार्यात एन.सी.सी. छात्र कश्या पद्धतीने सहभागी होऊ शकतात यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

महाविद्यालयातील एन. सी. सी अधिकारी लेफ्टनंट अरुण यादव व लेफ्टनंट स्वामिनाथ भट्टर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. ओ. कॅडेट सौरभ लघाटे व प्रास्तविक कॉर्पोरल सिद्धी राणे व आभारप्रदर्शन लीडिंग कॅडेट दुर्वांकुर चाळके याने केले.

या कार्यक्रमात एम. एस. नाईक फाउंडेशन, रत्नागिरीमधील स्वयंसेवक सौ. अफरोजा तांबे आणि त्यांचे सहकारी सौरभ पवार, ऋषिकेश रहाटे उपस्थित होते.

Comments are closed.