gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि भारत इतिहास संशोधक मंडळ यांच्यात सामंजस्य करार; स्थानिक इतिहासाच्या अभ्यासकांना सुवर्णसंधी

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे यांच्यात दि. २२ एप्रिल २०२२ रोजी सामंजस्य करार करण्यात आला.

गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील एक नामवंत महाविद्यालय आहे. महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध आस्थापनांबरोबर महाविद्यालयाने सामंजस्य करार केले असून या माध्यमातून विविध शैक्षणिक, सहशैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. प्रस्तुत करार त्याचाच एक भाग आहे. ऐतिहासिक संशोधन आणि लिपी वाचन प्रशिक्षण या क्षेत्रात मंडळ आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय एकत्रित काम करणार आहेत.

भारत इतिहास मंडळ ही भारताच्या व विषेत: मराठेशाहीच्या इतिहासाचे संशोधन करणारी भारतातील एक अग्रगण्य स्वायत्त संस्था आहे. तिची स्थापना ७ जुलै १९१० रोजी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी केली. भारताच्या सर्वांगीण इतिहास संशोधनासाठी आवश्यक ती ऐतिहासिक साधने संगृहीत करून त्यांचे शास्त्रशुद्ध जतन व प्रदर्शन करणे हे या संस्थेच्या स्थापनेचे प्रमुख उद्दिष्ट होते. दत्तो वामन पोतदार, ग. ह. खरे, त्र्यं. शं. शेजवलकर, वासुदेव सीताराम बेंद्रे, सदाशिव आठवले यांच्यासारख्या दिग्गज इतिहास संशोधकांनी मंडळाला समृद्ध करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

मोडी पत्रव्यवहार, कागदपत्रे, हिशोब वह्या, फार्सी कागदपत्रे, मजहर, करीने, सनदा असे भिन्न भाषांतील मिळून सोळा लाख कागद मंडळात आहेत. यात आदिलशाही, शिवकाल, पेशवाई इत्यादीतील जवळपास पन्नास घराण्यांचा कागदपत्रांचा समावेश आहे. शिवाय बाराशे दुर्मिळ लघुचित्रे, सोने, चांदी, तांबे ई. धातूंची सुमारे सात हजार नाणी तसेच अनेक मूर्ती, विरगळ, शस्त्रे वस्त्रे, नकाशे अशा विविध वस्तू या विभागात आहेत.

या सामंजस्य करारावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, सामंजस्य करार समिती समन्वयक डॉ. चित्र गोस्वामी, करार समन्वयक श्री. पंकज घाटे आणि मंडळाच्यावतीने अध्यक्ष श्री. प्रतीप रावत व सचिव श्री. पांडुरंग बलकवडे यांनी स्वाक्षरी केल्या.

या सामंजस्य करारांतर्गत अभ्यासक, शिक्षक- विद्यार्थी देवाणघेवाण, ऐतिहासिक संशोधन व प्रशिक्षण, मोडी आणि फारसी लिपी प्रशिक्षण वर्ग, किल्लेविषयक कार्यशाळा, प्रदर्शने, व्याख्याने, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्थानिक इतिहासाचे दस्तावेजीकरण, ऐतिहासिक कागदपत्रे वाचण्याचे प्रशिक्षण, वस्तू आणि वास्तूंचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना तसेच इतिहासप्रेमी अभ्यासकांना याचा लाभ होईल.

Comments are closed.