gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला संपन्न

gjc-dr-babasaheb-ambedkar-vyakhyanmala-april-2022

प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाचा वारसा जपण्याची नितांत गरज – प्राचार्य साळवे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१ व्या जयंती दिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य, प्राचार्य डॉ. बाळासाहेब साळवे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक धोरण’ या विषयावरील विशेष व्याख्यान नुकतेच संपन्न झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दरवर्षी विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. या व्याख्यानमालेचे १०वे पुष्प प्राचार्य डॉ. बाळासाहेब साळवे यांनी गुंफले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख अभ्यागतांचा परिचय हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनी करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली.

आपले विचार मांडताना डॉ. साळवे पुढे म्हणाले, भारतीय राज्यघटना निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह भारतातील अनेक शिक्षित विद्वानांनी आपले योगदान दिले आहेत. राज्यघटना तयार करीत असताना तिच्यातील प्रत्येक कलम-उपकलमावर सविस्तररीत्या चर्चा-विचार विनिमय, विचारमंथन झाले आहे. त्यामुळे असे संविधान जगात पुन्हा होणे नाही. या संविधानाचे सार म्हणजे त्याची उद्देशिका असून, भारतातील सामाजिक-राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक परिस्थितीला अनुरूप शासन आणि विविध आस्थापना, अल्पसंख्यांक, महिला आणि बालकल्याण विषयक विविध तरतुदी संविधानात करण्यात आल्या आहे. याबरोबरच मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये अशाया भागात संविधानकारांनीदूरदृष्टी ठेऊन शिक्षणविषयक मोलाच्या तरतुदी करून ठेवल्या आहेत. आजच्या शिक्षण क्षेत्राचा पाया संविधान असून, प्रत्येक भारतीय नागरिकाने हा वारसा जपून संविधानाचा प्रचार-प्रसार केला पाहिजे. मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे इ.चा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेशिक्षणविषयक विचार मांडताना त्यांनी भारतातील शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेऊन समकालीन शिक्षण व्यवस्था आणि भविष्यात येऊ घातलेल्या नवीन शैक्षणिकधोरणावर परखडपणे भाष्य केले.

याप्रसंगी डॉ. शाहू मधाळे यांचा जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूर या संस्थेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांनापारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे (Introduction to Library Science आणि MCQ’s in Library Science) प्रा. शिवाजी उकरंडे (अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विवेकवादास योगदान- रत्नागिरी जिल्ह्याच्या विशेष संदर्भासह), डॉ. एम. डी. गनी (रंगो ओ आहंग) यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोगटे जोगळेकर महविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. यास्मिन आवटे होत्या. उपस्थितांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण क्षेत्रातील ज्ञानाचा प्रचंड ध्यास घेऊन अभ्यास केलेले एक व्यक्तिमत्व होय. त्यांनी निर्माण केलेली संविधानाची रचनेच्या पायावर आज देश उभा आहे. त्यांच्या शिक्षण विषयक विचारांवर अधिकाधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे. समाज, आधुनिक भारताच्या निर्मितीसाठीत्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असून, भारताच्या जडणघडणीत आपले मोलाचे योगदान दिले आहे.

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या परिपत्रकानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त महाविद्यालयात सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत निबंध स्पर्धा, संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मागासवर्गीय विकास कक्षाच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. कृष्णात खांडेकर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, अभ्यंकर–कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या विशाखा सकपाळ, वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक-अध्यापक, विविध विभागप्रमुख, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, विद्यार्थी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध प्राध्यापक, समारंभ समिती सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments are closed.