gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकरच्या अर्थशास्त्र विभागाची सहयाद्री शिक्षण संस्था कृषी महाविद्यालयास क्षेत्र अभ्यास भेट

Polihouse

विद्यापीठ अभ्यासक्रमाचे बदलते आयाम आणि नॅक मुल्यांकन संस्थेची बदलती मूल्यमापन पध्दती, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवज्ञानाचे अभ्यासक्रमातील उद्देश या सर्वांच्या पार्श्वभूमीवर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्र भेट सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट्स, सावर्डे आणि कृषी महाविद्यालय खरवते, दहिवली, चिपळूण येथे नुकतीच संपन्न झाली.

यावेळी प्रत्यक्ष शेती करणे, शेतीपूरक व्यवसाय, स्वयंरोजगार, शेती उद्योजकता विकास या अनुषंगाने प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे शेती अर्थशास्त्राचा भाग असणारा आणि विद्यार्थ्यांसाठी भविष्यकालीन रोजगाराची संधीसाठी उपयुक्त असलेला स्थानिक उत्पादन प्रक्रिया उद्योग; याविषयीची माहिती याथाकानी देण्यात आली. वाईन निर्मिती, उत्पादन आणि विपणन याबाबत येथे विशेष मार्गदर्शन प्राप्त झाले.

कृषी महाविद्यालयातील अन्नतंत्रज्ञान विभागातील बेकरी युनिटला भेट देण्यात आली. बेकरी उत्पादन, कर्ज उपलब्धी, बाजारपेठ, विविध पदार्थ निर्मिती, यंत्रसामग्री याची माहिती मिळाली. तसेच जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेस भेट देऊन या क्षेत्रातील उपलब्ध संधींचा आढावा प्राप्त झाला. याच परिसरातील रोपवाटिका, पॉली हाऊसमधील विविध वनस्पतींची लागवड, त्यांचे उत्पादन व बाजारपेठ याचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता आला. यानंतर विद्यार्थ्यांनी आर्ट विभागातील चित्रकला, शिल्पकला विभागाला भेट देऊन चित्र आणि शिल्प तयार करण्याचे प्रात्यक्षिक पाहिले. तसेच कला दालनातील विविध प्रकारची चित्रे आणि शिल्पे पाहण्याची संधी मिळाली.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुमितकुमार पाटील व सहकारी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत कृषी अर्थशास्त्रातील अनेक नवीन संकल्पनांची माहिती विविध उदाहरणांसह दिली. अर्थशास्त्रासारखा जीवनावश्यक विषय क्षेत्रभेट अभ्यास पद्धतीने पाहता यावा, सैद्धांतिक ज्ञान आणि उपयोजित ज्ञान यांच्यातील समन्वय विद्यार्थ्यांना उमजून यावा व प्रामुख्याने कृषी अर्थशास्त्राच्या अनुषंगाने असणाऱ्या रोजगार संधींची त्यांना जाणीव व्हावी, अशा विविध उद्दिष्टांनी या अभ्यास भेटीचे नियोजन करण्यात आले होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ. रामा सरतापे, प्रा. तुळशीदास रोकडे, डॉ. दिनेश माश्रणकर, प्रा. सुर्यकांत माने, प्रा. दिलीप जाधव यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.

महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष आणि पदव्युत्तर पदवी विभागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्र अभ्यासातून कृषी अर्थशास्त्र विषयासंबंधी विविध संकल्पना आणि प्रत्यक्ष अध्यानाची संधी विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आली. विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला आणि समाधान व्यक्त केले.

Polihouse
shilpkala
Comments are closed.