gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘उर्दू शिक्षकांकरिता कार्यशाळेचे’ आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या उर्दू विभागाने उर्दू शाळांतील शिक्षकांकरिता एकदिवसीय शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन दि. ११ ऑगस्ट २०१८ रोजी केले आहे. राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न होणाऱ्या या कार्यशाळेसाठी ख्यातमान शिक्षणतज्ज्ञ श्री. मुबारक कापडी, आवाज या रायगड येथील दैनिकाचे संपादक श्री. मोहम्मद शफी पोरकर, रत्‍नागिरीतील पत्रकार रफिक मुकादम, जि. प. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी श्री. महेश जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेचे अध्यक्षपद रत्‍नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन भूषवतील. तर कार्यशाळेचे बीजभाषण गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर करणार आहेत.
जागितिकीकरणाच्या प्रभावामुळे पालकांचा इंग्रजीव्यतिरिक्त अन्य भाषांतील शाळांकडे आणि तेथील शिक्षणव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिकाधिक उदासीन बनत आहे. या पार्श्वभूमीवर उर्दू भाषेतील अध्यापन पद्धती अधिक सकस कशी बनवता येईल, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता कोणत्या नाविन्यपूर्ण योजना राबविता येतील यावर सदर कार्यशाळेत विचारविनिमय केला जाणार आहे.
कार्यशाळेच्या आयोजनाकरिता प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उर्दू विभागप्रमुख प्रा. दानिश गनी नियोजन करीत आहेत. या कार्यशाळेला अधिकाधिक उर्दू शिक्षकांनी आपला सहभाग दर्शवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments are closed.