gogate-college-autonomous-logo

‘समग्रतेने आणि परस्परावलंबित्वाने जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र’ – दीपक करंजीकर

‘समग्रतेने आणि परस्परावलंबित्वाने जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र’ - दीपक करंजीकर

‘भारताची संस्कृती ही समग्रतेची संस्कृती आहे. समाजातील सर्व घटकांचा विचार करून समग्रतेने आणि परस्परावलंबित्वाने जगायला शिकवणारा विचार म्हणजे अर्थशास्त्र होय’, असे प्रतिपादनअर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक व व्यवस्थापन तज्ज्ञ दीपक करंजीकर यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले. महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळातर्फे आयोजित ‘सुलभ अर्थशास्त्र’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. यास्मिन आवटे, कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी आणि वाङ्मय मंडळाचे समन्वयक व मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. गोपाळे यांनी,वाङ्मय मंडळातर्फे अर्थशास्त्र विषयावरील व्याख्यानाचे आयोजन हे वाङ्मय मंडळाच्या कक्षा रुंदावणारे असल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी बोलताना दीपक करंजीकर यांनी त्यांच्या अनुभवांचे दाखले देत, अर्थशास्त्राचा आपल्या जगण्याशी किती घनिष्ठ संबंध आहे हे स्पष्ट केले. या व्याख्यानादरम्यान गरज, क्रयशक्ती, मागणी, पुरवठा, संसाधने, पैसा, पतनिर्मिती, अर्थनिर्मिती, क्रेडिट इकॉनॉमी यासारख्या अनेक संज्ञा दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत त्यांनी स्पष्ट केल्या.“अर्थशास्त्र हे जगण्याचे व संसाधनांचे शास्त्र आहे” असे सांगताना त्यांनी अर्थशास्त्र व वित्तव्यवहार यावर सविस्तर भाष्य केले. अर्थशास्त्र हे कोणत्याही गोष्टीच्या उपयोगितेला प्राधान्य देते, काय परवडते यापेक्षा काय सोयीचे आहे याला महत्त्व देते, लालसेला नव्हे तर गरजेला महत्त्व देते, या अर्थाने अर्थशास्त्र हे एक मूल्य आहे. याउलट, वित्तव्यवहार हा लालसेशी निगडित असून अवैध चलाखी व सोयीस्कर अर्थ लावण्याचा आकड्यांचा खेळ असून तो तुम्हाला अप्रामाणिकपणाकडे घेऊन जातो. शेअर मार्केटसारखा वित्तव्यवहारफक्त व्यक्तिगत लाभाचा विचार करतो. म्हणून सर्व घोटाळे हे ‘वित्तीय’ स्वरूपाचे असतात, ‘अर्थशास्त्रीय’ नाही. म्हणून, अर्थशास्त्र हे मूल्य असेल तर वित्त हे कौशल्य आहे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना डॉ. यास्मिन आवटे यांनी अर्थशास्त्र हे इंजिन असून बाकी सर्व विषय हे रेल्वेच्या डब्यांप्रमाणे आहेत असे सांगत अर्थशास्त्राचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. कला व वाणिज्य शाखांतील सुमारे 300 विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. प्रा. स्नेहा शिवलकर यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शनाची जबाबदारी सांभाळली.

Comments are closed.