gogate-college

लोकशाही राज्य हा केवळ शासनाचा प्रकार नाही तर ती एक आदर्श जीवन पद्धती आहे डॉ. हर्षद भोसले भारतीय लोकशाहीला अधिकाधिक सक्षम बनविणारी राज्यघटना

अमेरिकन राज्यघटना ही क्रांतीतून जन्माला आली आहे, तर भारतीय राज्यघटना ही वैचारिक चर्चा, विचारमंथनातून जन्माला आली आहे. त्यामुळे देशकाल परिस्थितीनुसार तिच्यात घटनादुरुस्तीद्वारे बदल करण्यात आले असले तरी ती अद्याप टिकून आहे; भविष्यातही टिकून राहिल. लोकशाही राज्य हा केवळ शासनाचा प्रकार नाही तर ती एक आदर्श जीवनपद्धती आहे, भारतीय लोकशाहीला अधिकाधिक सक्षम बनविण्याचे मोलाचे कार्य भारतीय राज्यघटनेने केले आहे, असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. हर्षद भोसले यांनी केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात भारतीय संविधानानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील उपस्थित होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्यावतीने ‘भारतीय राज्यघटनेची मुलतत्वे आणि लोकशाही’ विषयावर डॉ. हर्षद भोसले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. भोसले पुढे म्हणाले की, भारतीय नागरिकांच्या जीवनात संविधानाचे मूलगामी बदल घडवून आणले आहेत. राज्यघटनेची प्रस्ताविका हा राज्यघटनेतील महत्वाचा भाग असून अगदी कमी वेळात संपूर्ण राज्यघटना समजण्याचे प्रस्ताविका हे साधन आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्येही त्यातून व्यक्त होतात.

राज्यघटना निर्मितीचा ऐतिहासिक आढावा घेताना डॉ. भोसले यांनी सांगितले की, खऱ्या अर्थाने भारतीय संविधान निर्मितीचा प्रारंभ ब्रिटीश काळातच झालेला होता. ब्रिटिशांच्या आगमनानंतर १०व्या आणि १९व्या शतकात पाश्चात्य उदारमतवादी विचारप्रवाह भारतात आला. या विचारप्रणालीचा भारतीय जनजीवनावर खूपच प्रभाव पडला. प्रशासकीय सोयीसाठी ब्रिटिशांनी केलेले विविध कायदे, देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात निर्माण झालेले विविध वैचारिक प्रवाह, इ. चा प्रभाव भारतीय संविधानावर पडला. त्यातून भारतीय राज्यघटनेची जडणघडण झाली. मुलभूत अधिकार, मुलभूत कर्तव्ये, भारतीय राज्यव्यवस्था, संघराज्य रचना आणि ती स्विकारण्यामागील संविधान निर्मात्यांची दूरदृष्टी, राज्यव्यवस्थेतील न्यायपालिकेची भूमिका अशा विविध पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले, ‘संविधान हे सर्व नागरिकांशी निगडीत असून, व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत नागरिकांचा संविधानाशी सबंध येतो. समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था यांचे नियमन करणारा तो एक जिवंत दस्ताऐवज असून तो आपण जपला पाहिजे असे नमूद केले.

यावेळी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले, असेच वाचन महाविद्यालयातील अन्य वर्गातील विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आठल्ये यांनी तर आभारप्रदर्शन व सूत्रसंचालन प्रा. निलेश पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमाला प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही विभागाचे उपप्राचार्य, डॉ. शाहू मधाळे, प्रा. तुळशीदास रोकडे, प्रा. सचिन सनगरे, प्रा. कृष्णात खांडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.