gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संस्कार व्याख्यानमाला संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वतीने दि. २१ सप्टेंबर २०२१ ते २५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत दररोज सायंकाळी ४ ते ५ या वेळेत विशेष संस्कार व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले . या व्याख्यानमालेत मार्गदर्शक म्हणून पुणे येथील संस्कृतचे अभ्यासक डॉ.माधव केळकर उपस्थित होते. दि. २१ सप्टेंबर रोजी संस्कार :- संकल्पना आणि व्याप्ती , दि.२२ सप्टेंबर रोजी जन्मपूर्व संस्कार ते चुडाकर्म संस्कार , दि. २३ सप्टेंबर रोजी उपनयन संस्कार , दि. २४ सप्टेंबर रोजी विवाह संस्कार आणि दि. २५ सप्टेंबर रोजी अन्त्येष्टि संस्कार यापद्धतीने सर्व संस्कार अभ्यासपूर्णरीतिने सर्व उपस्थितांसमोर विशद केले.भारतीय संस्कृतीमधील या विविध घटकांचा संशोधनात्मक पद्धतीने अभ्यास कसा करावा, त्याचे सादरीकरण कसे असावे, अशा व्यापक विषयांच्या मांडणीसाठी वेळेचे नियोजन कसे करावे, वैज्ञानिक आणि व्यावहारिक विषयांचा अशा विषयांशी संबंध कसा शोधावा अशा अनेक विषयांचे प्रात्यक्षिक म्हणजे ही व्याख्यानमाला होती. विशेष करून महाविद्यालयाच्या संस्कृत विषयाच्या पाठ्यक्रमात असलेल्या ‘संस्कार’ या विषयाची ओळख व त्याकडे बघण्याचा व्यापक आणि वेगळा दृष्टीकोन या व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांना प्राप्त झाला. Online पद्धतीने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेचा लाभ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाबरोबरच नाशिक , पुणे , मुंबई , औरंगाबाद ,अमरावती , जळगाव , सिंधुदुर्ग , रायगड , सातारा , सांगली , ठाणे , वाशिम , यवतमाळ अशा अनेक ठिकाणच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेता आला. या व्याख्यानमालेसाठी १००हून अधिक विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती आणि पाच दिवसात प्रतिदिवशी सुमारे ४५ ते ५० विद्यार्थी हजर होते. या व्याख्यानमालेमुळे अनेकांचा गोगटे जोगळेकर महाविद्यालयाशी नव्याने संपर्क निर्माण झाला.

दिनांक २५ सप्टेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजता या व्याख्यानमालेचा समारोप online पद्धतीने करण्यात आला. यावेळी या व्याख्यानमालेसाठी निमंत्रणाचा स्वीकार केल्याबद्दल डॉ.माधव केळकर यांना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी धन्यवाद दिले आणि भविष्यात प्रत्यक्ष व्याख्यानाचा लाभ घेण्याची संधी महाविद्यालयास लवकरच प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त केला.या व्याख्यानमालेत सहभागी झालेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रीति टिकेकर यांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली .

संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी व्याख्यानातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले आणि मार्गदर्शक डॉ.माधव केळकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि भविष्यात या विद्यार्थ्यांबरोबरच उपस्थित सर्वांना याचा आपल्या जीवनात वेळोवेळी निश्चितच उपयोग होईल असे नमूद केले. शान्तिमन्त्राने या व्याख्यानमालेची सांगता करण्यात आली.

Comments are closed.