gogate-college-autonomous-logo

गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात ‘नवमतदार नोंदणी’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात तरुण आणि पात्र नवमतदारांसाठी नवमतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. भारताने लोकशाही शासनपध्दतीचा स्विकार केला असून १८ वर्षावरील सर्व भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मुक्त, खुल्या आणि नि:ष्पक्ष निवडणुका या लोकशाहीचा आधार असतात. निवडणुकांच्या संचलनाची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. दरवर्षी आयोगामार्फत अद्ययावत मतदार यादी तयार केली जाते. या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेणाऱ्या तरुण व पात्र विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मतदारनोंदणी करता यावी या हेतूने नवमतदार नोंदणी अभियान राबविण्यात येते. या पार्श्वभूमीवर गोगटे जोगळेक रमहाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राज्यशास्त्र विभाग आणि निवडणूक शाखा, तहसीलदार कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने नवमतदारांसाठी ‘नवमतदार नोंदणी अभियान’ राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत नवमतदार विद्यार्थांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरुपात मतदार नोंदणी केली.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार माधवी कांबळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, मतदार नोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरु असते. नवमतदार विद्यार्थांनी स्वतः नोंदणी करून, नागरिकांमध्ये देखील मतदार नोंदणी प्रक्रियेविषयी जनजागृतीचे कार्य राष्ट्रीय कार्यम्हणून करावे आणि लोकशाही सक्षमीकरणासाठी हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थांना केले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थांना मतदान नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर विद्यार्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले, भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना अनेक अधिकार दिलेले असून, मतदानासारखा पवित्र हक्कही दिलेला आहे. लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. परंतु हा हक्क बजावण्यापूर्वी नागरिकांनी मतदार नोंदणी अर्ज भरणे आवश्यक आहे. म्हणून या अभियानात विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन नवमतदार नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थांना केले.

याप्रसंगी महाविद्यातील कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद ठाकूरदेसाई, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, तहसील कार्यालयातील कर्मचारी श्री. परिमल डोर्लेकर आदीसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या डॉ. सोनाली कदम यांनी तर आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील यांनी केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचे बहुमोल मागर्दर्शन तर श्री. प्रसाद गवाणकर, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या नवमतदार नोंदणी अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments are closed.