gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात राष्ट्रीय ग्रंथालय दिवस विविधरंगी कार्यक्रमांनी साजरा

National Library Day Celebration

१२ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय ग्रंथालय दिवस’ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात उत्साहपूर्ण वातावरणात आणि विविधरंगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून सकाळच्या सत्रात विज्ञान, कला आणि वाणिज्य विभागातील विविध विषयावरील नवनवीन ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते संपन्न झाले. दुपारच्या सत्रात ‘वाचेल तो वाचेल’ या वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक श्री. किरण धांडोरे आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालय आणि वाचक गटाच्या विद्यार्थ्यांनी ‘वाचेल तो वाचेल’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. काय वाचावे, कसे वाचावे आणि कां वाचावे याविषयी आपली मते मांडली आणि ‘वाचन संस्कृती’चा आढावा घेतला. त्यानंतर ग्रंथालयाच्या विविध योजना आणि उपक्रम ज्या विद्यार्थी केंद्रस्थानी मानून प्रतिवर्षी ग्रंथालयामार्फत राबविल्या जातात त्याअंतर्गत मागासवर्गीय पुस्तक पेढी योजना, गराजू विद्यार्थी पुस्तक पेढी योजना, हुशार विद्यार्थी पुस्तक पेढी योजना, सर्वांसाठी पुस्तक पेढी योजना या योजनांतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तक संचांचे वितरण करण्यात आले. ‘वाचक गट’ या महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या विद्यार्थीप्रिय उपमाचेही उद्घाटन संपन्न झाले.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक श्री. किरण धांडोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थी दशेपासूनच आपण वाचन आणि अभ्यास यांची सांगड घातल्यास यश नक्की मिळेल; असे सांगताना ग्रंथालयाची कास धरा असे आवाहन केले. राज्यातील ग्रंथालय चळवळीचा आढावा घेताना बदलता काळ हा केवळ वाचनाने समृद्ध करता येऊ शकेल असा आशावाद व्यक्त केला. याठिकाणी आल्यावर खूप आनंद झाला असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाच्या विकासाचे विविध टप्पे उलगडून दाखविले. पारंपारिक ते आधुनिक असा ग्रंथालयाचा प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला. ‘मुक्तद्वार पध्दती’ हे या ग्रंथालयाचे प्रमुख बलस्थान असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासात यापुढेही हे ग्रंथालय आपली महत्वाची भूमिका बजावत राहील असे नमूद केले. ग्रंथालयाच्या विविध उपक्रमांमद्धे सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. ‘पुस्तक हे एक असे माध्यम आहे की ते आपल्या मनाला विश्रांती देते’ असा संदेश विद्यार्थ्यांना देऊन त्यांनी आपल्या मनोगताची सांगता केली.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय सुतार या विद्यार्थ्याने तर प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन प्र. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले. या कार्यक्रमाला विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, ग्रंथालय कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रंथालयाच्या विविध उपक्रमांतून सहभागी झालेले विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.