gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात महसूल दिन आणि नव मतदार जनजागृती कार्यक्रम साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात महसूल दिन आणि नव मतदार जनजागृती कार्यक्रम साजरा

उपविभागीय अधिकारी कार्यालय, रत्नागिरी, रत्नागिरी तहसीलदार कार्यालय आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागयांच्या संयुक्तविद्यमाने दि. २ ऑगस्ट रोजी महाविद्यालयात महसूल दिन आणि नवमतदार जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने दि. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट, २०२३ या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महसूल दिन आणि नवमतदारांमध्ये मतदार प्रक्रियेसंदर्भात जनजागृती होऊन मतदान प्रक्रियेत त्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा, या हेतूने भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाविद्यालयात नवमतदार नोंदणी अभियान आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतात अप्पर तहसीलदार श्री. राकेश गिड्डे यांनी उपस्थितांना महसूल दिन आणिनवमतदार जनजागृती कार्यक्रम, तो आयोजित करण्याचा प्रमुख उद्देश, निवडणूक प्रक्रिया, शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणारे जनजागृती विषयक विविध कार्यक्रम यांची माहिती दिली.

यानंतर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी यांनी उपस्थितांना मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून, सशक्त, सुदृढ भारताच्या निर्मितीसाठी मतदानाच्या टक्केवारी वाढीबरोबरच उमेदवार निवड गुणवत्ताही वाढली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच शासनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी नायब तहसीलदार श्री. अजित गोसावी यांनी शासनाच्या वतीनेविद्यार्थांना शैक्षणिक कामकाजाकारिता देण्यात येणारे आणि अन्य नागरिकांना आवश्यक असलेले विविध दाखले,ते काढण्यासाठीची अर्जप्रक्रिया यांची पीपीटीच्या माधमातून माहिती दिली.

याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. राहुल गायकवाड यांनी नवमतदारांना मार्गदर्शन केले. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा पवित्र हक्क बहाल केला असून, मतदारांनी अधिक सजगपणे हा हक्क बजावला पाहिजे. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून, भारतीय लोकशाहीची चर्चा विविध अंगांनी संपूर्ण जगभरात केली जाते. ती अधिकाधिक सक्षम करण्याची जबाबदारी नवमतदारांवर आहे. त्यामुळे मतदानाचा पवित्र हक्क बजाविण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या नावाची मतदारयादीत नोंदणी करून घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी नवमतदारांना केले.

या कार्यक्रमाला कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डी. आर. वालावलकर,प्रा. सुनील गोसावी, राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील, तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता तहसीलदार कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी श्री. जोशी, श्री. गुरव, महाविद्यालयातील कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments are closed.