gogate-college-autonomous-logo

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयातर्फे पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रंथालय परिचय’ प्रशिक्षण संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाच्यावतीने महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन ‘ग्रंथालय परिचय’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन ग्रंथालय हे कोकण विभागातील एक महत्वाचे ग्रंथालय असून या ग्रंथालयातर्फे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना आधुनिक सुविधा देण्यात येतात. लाखापेक्षा जास्त ग्रंथसंग्रह असणारे हे ग्रंथालय पूर्णत: संगणकीकृत असून विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना पूरक अशा सर्व अत्याधुनिक सेवा-सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थी प्रशिक्षणाचा एक महत्वाचा भाग म्हणून पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह, संगणक सॉफ्टवेअरचा वापर, ऑनलाइन डाटाबेस यामध्ये ईबुक्स, ईजर्नल्स, थिसीस इ. या इलेक्ट्रोनिक्स साधनांचा वापर अभ्यास आणि विविध उपक्रम याकरिता कसा करावा याची सविस्तर माहिती देण्यात आली. डेलनेट आणि इंफ्लीबनेट-एनलिस्ट या मोठ्या ऑनलाइन डाटाबेसचा वापर करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

प्रारंभी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सीमा कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये त्यांनी ग्रंथालयातील ग्रंथ आणि ऑनलाइन डाटाबेस इ. साधनांची माहिती विशेषतः पदव्युत्तर विद्यार्थ्यांना असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले; आणि ग्रंथालयाच्या ‘विद्यार्थी प्रशिक्षण’ उपक्रमाला आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी ऑनलाइन माध्यमातून पीपीटीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांनी आपल्या अध्ययन कार्यात जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना याप्रसंगी केले.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रा. स्वरूप घैसास तसेच ग्रंथालय कर्मचाऱ्यांची मदत झाली.

Comments are closed.