gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न

gjc-marathi-bhasha-din-2022

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दिनानिमित्त डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी “काय वाचावे? कसे वाचावे?” या विषयावर आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानात विद्यार्थ्यांनी पुस्तकाची निवड कशी करावी, कोणती पुस्तके वाचावी, ती कशा पद्धतीने वाचावी याविषयी मार्गदर्शन केले. “शब्दांत खूप मोठे सामर्थ्य आहे. वाचन करणे हा एका वेगळया अर्थाने आपल्याला संपन्न करणारा अनुभव आहे. म्हणून आपण आवर्जून पुस्तके वाचली पाहिजेत”, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

या विशेष व्याख्यानाबरोबरच महाविद्यालयाच्या मराठी विभागाने सहकार भित्तीपत्रकाचे आयोजन केले होते. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचा हस्ते या भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. सहकार भित्तीपत्रकाबरोबरच मराठी तसेच विज्ञान विषयांवरील पुस्तकांचे प्रदर्शनही आयोजित केले होते. या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी म्हणाले, “आपण सर्वांनी वाचनाची आवड जोपासली पाहिजे. वाचनाने आपल्याला समृद्धता प्राप्त होते. वाचनाबरोबर लेखन कौशल्येदेखील विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजेत.”

सदर कार्यक्रमांच्या प्रास्ताविकात प्रा. शिवराज गोपाळे यांनी मराठी विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सहकार भित्तीपत्रक कार्यक्रमाच्या अनावरण प्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या अभिवाचन स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या कु. आर्या समीर वंडकर हिचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सीमा वीर यांनी केले.

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने संपन्न झालेल्या या कार्यक्रमांच्या प्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, सहकार वार्षिक अंकाचे संपादक डॉ. शाहू मधाळे, ग्रंथपाल किरण धांडोरे, डॉ. निधी पटवर्धन, प्रा. शार्दुल रानडे, श्री. उत्पल वाकडे आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Comments are closed.