gogate-college-autonomous-logo

देशाच्या ७५व्या अमृत महोत्सवीवर्षाच्या निमित्ताने कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात विविध प्रदर्शनांचे आयोजन

gjc-library-book-exhibition-1

देशाच्या ७५व्या अमृत महोत्सवीवर्षाच्या निमित्ताने आणि दि. १५ ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्यसाधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘स्वातंत्र्यलढ्यातील लोकोत्तर पुरुषांचे योगदान’ या विषयावरील ‘सहकार’ भित्तीपत्रकाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर ध्वजारोहण संपन्न झाल्यावर ग्रंथालयात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या क्रांतिकारकांची माहिती, लेख आणि चित्रे यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रदर्शनाचे समन्वयक प्रा. शिवराज गोपाळे, प्रा. अरुण यादव, प्रा. अंबादास रोडगे, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, प्रा. दिलीप सरदेसाई आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विजय सुतार यांनी केले.

दि. १६ ऑगस्ट रोजी कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात इतिहास, भारतीय स्वातंत्र्य लढा, क्रांतिकारक, देशभक्त इ. साहित्यविषयक ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, इतिहास विभागप्रमुख प्रा. पंकज घाटे, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे उपस्थित होते.

ग्रंथालयात हिंदू जागृती जनजागृती समितीने भारतीय देशक्तांविषयी माहिती देणारे आणि त्यांच्या देशासाठी दिलेल्या बलिदानाचे पोस्टर प्रदर्शन प्रदर्शनाचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देशभक्त क्रांतीकारक आणि भारतीय इतिहासातील अजरामर व्यक्तींची चारीत्रमाला स्मरणात आणून द्यावी या उद्देशाने प्रामुख्याने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी ‘आपलाल्या आज स्वातंत्र्य मिळाले आहे; तुम्ही स्वतंत्र्य भारतात जन्माला आले आहात. परंतु हे स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी ज्या ज्ञात-अज्ञात क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे; आपण त्याचे कायम स्मरण केले पाहिजे. आपणही देशासाठी काहीतरी करण्याची भावना प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आपला देश आपल्या हातात सुरक्षित असला पाहिजे आणि जे कार्य क्रांतिकारकांनी केले त्याचे स्मरण प्रत्येक नागरिकाने ठेवल्यास आपण खऱ्या अर्थाने भारताचे जबाबदार नागरिक ठरू शकतो.’ असे सांगून ‘आजची ही दोन्ही प्रदर्शने आपल्या प्रत्येकाच्या मनात ज्या देश बांधवांनी आपल्या देशासाठी स्वत:च्या अनमोल प्राणांची आहुती दिली त्यांच्याविषयी आपली देशभक्तीची भावना निश्चितच दृढ करतील असा मला विश्वास आहे.’ असे नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे तर आभारप्रदर्शन सहा. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर प्रदर्शन दोन दिवस विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासाठी खुले राहणार आहे.

gjc-library-book-exhibition-3
Comments are closed.