gogate-college-autonomous-logo

व्यवस्थेकडून योग्य कामाची दखल योग्यवेळी घेतली जातेच – प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर

व्यवस्थेकडून योग्य कामाची दखल योग्यवेळी घेतली जातेच त्यासाठी काही अवधी जाऊ द्यावा लागतो. मला मिळालेल्या सन्मानामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेवर नियुक्ती झाल्याबद्दल महाविद्यालयात आयोजित सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठातील एक नामवंत आणि प्रतिष्ठीत असे महाविद्यालय असून सांस्कृतिक उपक्रम, क्रीडा, गुणवत्ताधारक शिक्षक आणि विद्यार्थी अशा अनेक घटकांच्या बाबतीत विद्यापीठवर्तुळात आपल्याकडे आदर्श म्हणून पहिले जाते. मला मिळालेल्या सन्मानात या महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांचे भरीव योगदान आहे; याचे फलित म्हणून ही नियुक्ती होय. भविष्यात आपण सर्वच अशीच वाटचाल करीत राहू, अशी अशा आपण बाळगूया. याप्रसंगी प्राध्यापकांच्यावतीने उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे आणि डॉ. शाहू मधाळे यांनी प्राचार्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावतीने प्रबंधक श्री. मोहन कांबळे आणि श्री. विजयकुमार काकतकर यांनीही त्यांचा सत्कार केला.

कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे उपस्थित होते. तसेच विविध विषयांचे विभागप्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. आनंद आंबेकर यांनी केले.

Comments are closed.