gogate-college-autonomous-logo

‘भारतातील परिस्थितीला अनुरूप संविधानाची निर्मिती’ – प्रा. डॉ.अभिनया कांबळे; गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात महराष्ट्रातील सुविख्यात विचारवंत,स्त्री प्रश्नांच्या अभ्यासक प्रा. डॉ. अभिनया कांबळे यांचे ‘भारतीय समाजातील संविधानिक मूल्यांची वाटचाल आणि समकालीन आव्हाने’ या विषयावरील विशेष व्याख्यान संपन्न झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात दरवर्षी विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. या व्याख्यानमालेचे ११वे पुष्प के. जे. सोमय्या महाविद्यालय, मुंबई येथील प्राध्यापिका आणि राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अभिनया कांबळे यांनी गुंफले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख अभ्यागतांचा परिचय समारंभ समितीप्रमुख प्रा. शिवाजी उकरंडे यांनी करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली.

आपले विचार मांडताना डॉ. कांबळे पुढे म्हणाल्या, भारतीय राज्यघटना निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरजेरेमी बेन्थेम,जे.एस. मिल, जॉन लॉक या पाश्चात्य विचारवंतांच्याविचारांचा प्रभाव पडला होता. तसेच ब्रिटीश–अमेरिकन राज्यघटना ज्या मूलभूत राजकीय तत्त्वांवर आधारित आहे त्या तत्वांचाही प्रभाव डॉ. बाबासाहेबांवर पडलेला होता. याविचारवंतांचे विचार, तत्वेप्रत्यक्षात आणण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून केले. भारताचा खंडप्राय विस्तार, जात, भाषा, प्रांत, धर्म अशा विविधता असलेल्या प्रदेशातील परिस्थितीला अनुरूप संविधान संविधान निर्मात्यांनी तयार केले, ज्यावर आज आपल्या देशाची राज्यव्यवस्था उभी आहे. या संविधानाचे सार म्हणजे त्याची उद्देशिका असून, त्यात सांगितलेली तत्वे अत्यंत महत्वाची आहेत. भारतातील सामाजिक-राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक परिस्थितीला अनुरूप शासन आणि विविध आस्थापना, अल्पसंख्यांक, महिला आणि बालकल्याण विषयक विविध तरतुदी संविधानात करण्यात आल्या आहे. याबरोबरच मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये या भागात संविधानकारांनी दूरदृष्टी ठेऊन मोलाच्या तरतुदी करून ठेवल्या आहेत. आपलेविचार मांडताना त्यांनी भारतातील विविध क्षेत्रातील वाटचालीचा आढावा घेऊन समकालीन प्रश्नआणि आव्हाने यावर भाष्य केले.

याप्रसंगी वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत विद्यार्थांच्या निवडक निबंधांचा समावेश असलेल्या भित्तीपत्रकांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी होते. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण क्षेत्रातील ज्ञानाचा प्रचंड ध्यास घेऊन अभ्यास केलेले एक ज्ञानसूर्य होय. त्यांनी निर्माण केलेली संविधानाची रचना, पायावर आज आपलादेश उभा आहे. समाज, आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असून, भारताच्या जडणघडणीत त्यांचेमोलाचे योगदान आहे. आपण सर्वांनी त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी केले. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रमेश कांबळे, महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर,वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक-अध्यापक, विविध विभागप्रमुख, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विविध प्राध्यापक, समारंभ समिती सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी, सेवकवर्ग, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments are closed.