gogate-college-autonomous-logo

“नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमातील नवनवीन बदलांसाठी र. ए. संस्था प्रयत्नशील” – श्री.सतीश शेवडे; गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ संपन्न

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमातील नवनवीन बदलांसाठी रत्नागिरी एज्युकेशन संस्था प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन र. ए. सोसायटीचे सचिव श्री. सतीश शेवडे यांनी येथे केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित पदवीदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

मुंबई विद्यापीठाच्या मार्च-२०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा पदवीदान समारंभ  महाविद्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून र. ए. सोसायटीचे सचिव श्री. सतीश शेवडे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात  विद्यापीठ गीताने झाली.आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात महविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त  कुलकर्णी यांनी  महाविद्यालयाच्या शिक्षण, संशोधन क्षेत्रातील प्रगतीचा लेखाजोगा मांडून भारतीय शिक्षण पद्धती, तिच्यात  काळानुरूप होऊ घातलेले बदल, आगामी काळातील नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी, शिक्षण क्षेत्रात निर्माण होणाऱ्या विविध समस्या, आव्हाने आणि संधी अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकून शिक्षक-विद्यार्थ्यांनीही शिक्षण क्षेत्रातील नवीन बदलांना सामोरे गेले पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे आव्हान म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. तसेच जून, २०२३ पासून गोगटे – जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त होणार असल्याचे प्र. प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी याप्रसंगी जाहीर केले.

श्री. शेवडे पुढे म्हणाले की, गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून पदवी घेऊन तुम्ही बाहेर पडत आहात, जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे तुम्हाला एक वेगळी ओळख मिळेल. मुंबई विद्यापीठात महाविद्यालयाचा एक वेगळा ठसा उमटला असून, उर्वरित महाराष्ट्रातदेखील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाकडे एक आदर्श, उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून पाहिले जाते. आगामी काळात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विविध नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्था, महाविद्यालय प्रयत्नशील आहे. संस्थेचे संस्थापक कै. बाबुराव जोशी, कै. मालतीबाई जोशी आणि कै. अरुअप्पा जोशी यांना आदर्श मानून संस्था, गोगटे जोगळेकर महाविद्यालय वाटचाल करीत असून, भविष्यातही संस्था आणि महाविद्यालय अशीच उल्लेखनीय वाटचाल करेल, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.

या पदवीदान सोहळ्यात पीएच. डी. पदवी प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अजिंक्य पिलणकर यांच्यासह पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे समारंभपूर्वक प्रदान करण्यात येऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, कोकणातील एका प्रतिष्ठित असा गौरव असणाऱ्या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन तुम्ही बाहेर पडत आहात. आपण ज्या संस्थेच्या  महाविद्यालयातून शिक्षण घेतो त्या संस्थेला आपण विसरू नये. आजमितीला शिक्षण क्षेत्रात काळानुरूप विविध प्रकारचे बदल होत आहे. समकाळात विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय शिक्षण देणे गरजेचे असून, विद्यार्थ्यांनीदेखील विविध प्रकारचे कलाकौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येकजण नोकरीच्या शोधात असतो, पण आपण नोकरी देणारे झालो पाहिजे. समाज, देशाचे आपल्यावर विविध प्रकारचे ऋण आहेत ते फेडण्यासाठी देशाचा एक उत्तम, सजग नागरिक होणे आवश्यक असून, ते शिक्षणामुळे साध्य होते. एक चांगला माणूस घडणे महत्त्वाचे आहेच; परंतु त्याही पलीकडे जाऊन आपण आपला देश, आपल्या समाजासाठी आपणकाम करायला पाहिजे, सामाजिक जबाबदारी, उत्तरदायित्वाचेभान येणे म्हणजे देशाचा एक चांगला, सुजाण नागरिक घडणे होय, असे त्या पुढे म्हणाल्या. जीवनात निश्चित ध्येय ठेवून वाटचाल केल्यास यशाचे शिखर नक्कीच गाठता येते. त्यामुळे विद्यार्थांनी सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे पाहत वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थांना केले.

या प्रसंगी व्यासपीठावर र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीश शेवडे,  महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तेजश्री भावे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी  प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, श्री. प्रसाद गवाणकर, समारंभ समिती प्रमुख प्रा. शिवाजी उकरंडे यांच्यासह समिती सदस्य, कार्यालयीन कर्मचारी, सेवकवर्ग आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला तिन्ही शाखेच्याउपप्राचार्या, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पदवीप्राप्त विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Convocation-2023

Comments are closed.