gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला ४९ व्या युवा महोत्सवाचे उपविजेतेपद

Youth Photo

मुंबई विद्यापीठाच्या ४९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ आणि ५०व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाचा शुभारंभ फोर्ट येथील कॉन्व्होकेशन हॉलमध्ये दिमाखदार कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने ४९व्या युवा महोत्सवाच्या सर्वसाधारण उपविजेतेपदावर आपले नाव कोरले.

याप्रसंगी संगीत, नाट्य, साहित्य, नृत्य, ललित कला, आदी क्षेत्रातील पंचरत्नांची उपस्थिती लाभली होती. पद्मभूषण पुरस्कार प्राप्त नृत्यांगना डॉ. कनक रेळे, गायक-संगीतकार शंकर महादेवन, अभिनेते मनोज जोशी, साहित्यिक अरुण म्हात्रे, ललित कलेतील सॅमसन डेव्हिड आदी दिग्गज महारथींसह मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, सांस्कृतिक समन्वयक डॉ. निलेश सावे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विद्यापीठ गीताने झाली. त्यानंतर प्रतिकात्मक वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमात प्रख्यात चित्रकार श्री. देवदत्त पाडे यांनी तयार केलेल्या संगीत, नाट्य, साहित्य, नृत्य, ललित कला यांच्या लोगोंचे अनावरण करण्यात आले. या लोगोंची रांगोळीही विद्यापीठ परिसरात रेखाटण्यात आली होती. यावेळी शंकर महादेवन यांनी ‘सूर निरागस हो’ हे गीत सादर करून वातावरण मंगलमय केले. अरुण म्हात्रे यांनी ‘उंच माझा झोका’ हे मालिकेचे शिर्षक गीत सादर केले. तर अभिनेते मनोज जोशी यांनी आपल्या ‘आचार्य चाणक्य’ या भूमिकेतील निष्ठा काय असते या विषयावरील संवादाचे सादरीकरण केले. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.त्याचप्रमाणे सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि महाविद्यालयांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमात ४९व्या युवा महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले. यामध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकाविणाऱ्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, श्री. प्रसाद गवाणकर, रत्नागिरी जिल्हा सांस्कृतिक समन्वयक प्रा. आनंद आंबेकर, महाविद्यालयाच्या माजी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. यास्मिन आवटे, आजी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. निधी पटवर्धन यांनी हा सन्मान स्विकारला. ४९व्या युवा महोत्सवात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने सर्वसाधारण उपविजेतेपदासह वाङमय विभागात सर्वसाधारण विजेतेपदही मिळविले.

त्याचबरोबर महाविद्यालयाचा विद्यार्थी जयदीप परांजपे अत्यंत प्रतिष्ठेच्या असणाऱ्या ‘मिस्टर युनिव्हर्सिटी’ किताबाचा मानकरी ठरला. मराठी वादविवाद, वक्तृत्व, एकपात्री, स्पॉट फोटोग्राफी या प्रकारांमध्ये महाविद्यालयाने सुवर्ण पदकांची कमाई केली. तर हिंदी वादविवादाने द्वितीय क्रमांक मिळविला. लोकनृत्य, स्कीट, मराठी एकांकिका यांना उत्तेजनार्थ क्रमांक देऊन गौरविण्यात आले. यांसह ४९व्या आंतरजिल्हा सांस्कृतिक महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद महाविद्यालयाने प्राप्त केले. ५०व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या दक्षिण रत्नागिरी विभागाच्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्याबाबत गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि रत्नागिरी जिल्हा सांस्कृतिक समन्वयक प्रा. आनंद आंबेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Comments are closed.