gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय संस्कृत संस्थान केंद्राचे उद्घाटन

संस्कृत भाषा शिकण्याची संधी राष्ट्रीय संस्कृत संस्थानने एका वेगळ्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या या संस्थानने देशभरात अनेक अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्रे सुरु केली. त्यातील एक केंद्र रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला मिळाले. गेल्या वर्षी या अभ्यासक्रमाकरिता ९६ जणांनी प्रवेश घेतला होता. यावर्षीही महाविद्यालयाला सदर केंद्र मिळाले असून हिमाचल प्रदेश येथील प्रा. हिरालाल शर्मा या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर केंद्राचे उद्घाटन नुकतेच प्रा. वैशाली हळबे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी उपस्थित होत्या. संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. त्यांनी या संस्कृत केंद्राचे स्वरूप आणि प्रयोजन विषद केले. प्रमुख अतिथी प्रा. वैशाली हळबे यांनी संस्कृत भाषा शिकण्याची आवश्यकता कथा, प्रहेलिका सांगत श्रोत्यांनी पटवून दिली. केंद्र शिक्षक प्रा. हिरालाल शर्मा यांनी संस्कृत उच्चारणाने योग साधना होते तसेच संस्कृत शिक्षणाचेही कार्य घडते त्यासाठी संस्कृत शिक्षण केंद्रात शिकण्याचा फायदा कसा होऊ शकतो हे विषद केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. चित्रा गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना या प्रशिक्षण केंद्रात सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात गतवर्षी केंद्र शिक्षक असलेले श्री. रवी उपाध्याय यांच्याकडून संस्कृत शिकण्याचा अनुभव सौ सुनेत्रा जोशी आणि श्री. मुकुंद नायक यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.

राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या महाविद्यालयातील या केंद्रासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी पुढाकार घेऊन या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले आहे.

अनौपचारिक संस्कृत केंद्रात संस्कृत भाषा शिकण्याची इच्छा असलेल्यांनी महाविद्यालयाच्या संस्कृत विभागात संपर्क साधावा. हे वर्ग दि. १८ सप्टेंबर २०१७ पासून आठवड्यातून ३/४ दिवस सुरु होत आहेत.

कार्यक्रमाचा प्रारंभ कु. कीर्ती करकरे आणि कु. प्रतिमा खानोलकर यांनी सादर केलेल्या ईशस्तवनाने झाला आणि शांती मंत्राने सांगता झाली.

Comments are closed.