gogate-college

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘युगानुयुगे तूच’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा अधोरेखित करणाऱ्या प्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’ या दीर्घ कविता संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवियित्री नीरजा यांच्या हस्ते झाले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये नुकताच सदर प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ कवियित्री नीरजा, कवी अजय कांडर, प्रा. जयश्री बर्वे, पत्रकार श्री. सचिन परब, कला विभागाच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाङ्मय मंडळ प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते. प्रकाशनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या चर्चासत्रात मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

‘युगानुयुगे तूच’ या दीर्घ कविता संग्रहाकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सर्व वर्गापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग म्हणून आपण पहिले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. जयश्री बर्वे यांनी केले. कवी अजय कांडर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर दीर्घ काव्य लिहून समाजातल्या सर्व स्तरातल्या वर्गाने समतेच्या विचारावर एकत्र नांदायला पाहिजे, असे यावेळी उपस्थितांना आवाहन केले. तर ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांनी विचार संपवून टाकण्याच्या या काळात ‘युगानुयुगे तूच’सारखा दीर्घ कविता संग्रह प्रसिद्ध होणे म्हणजे बाबासाहेबांच्या माणसाकडून माणसाकडे जाण्याच्या विचाराचं पुनर्जागरणच होय असे चर्चासत्रात प्रतिपादन केले. या कवितासंग्रहाबाबत आपली भूमिका मांडताना पत्रकार श्री. सचिन परब यांनी ‘आजच्या काळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज कवी कांडर यांनी अतिशय सोप्या भाषेत मांडली आहे.’ असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवराज गोपाळे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. सीमा वीर यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांबरोबरच दै. तरुण भारत, रत्नागिरी आवृत्तीचे संपादक श्री. राजा खानोलकर, आर्ट सर्कलचे श्री. नितीन कानविंदे, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.