gogate-college
Swayamrojgar Programme

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात स्वयंरोजगार शिबिराचे उदघाटन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि खादी ग्रामोद्योग आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वयंरोजगार शिबिराचे उदघाटन दि. 9 डिसेंबर 2017 रोजी संपन्न झाले. या शिबिराकरिता प्रतिथयश व्यावसायिक उदय लोध उदघाटक म्हणून लाभले होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा मराठी विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करत असतो. याच अनुषंगाने खादी ग्रामोद्योग आयोगाच्या सहकार्यातून महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात स्वयंरोजगार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रसिद्ध उद्योजक उदय लोध, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवराज गोपाळे यांनी केले. उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना उदय लोध म्हणाले की, स्वयंरोजगार करत असताना कोणत्याही कमाला कमी लेखू नका. आज महाराष्ट्रात कौशल्य विकासाचे 600 तर राष्ट्रीय स्तरावर 21 हजार प्रकार आहेत. त्यांची माहिती घेण्याची गरज आहे. स्वयंरोजगार आपल्याला आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळवून देतो. जेव्हा आपण स्वतः घडत असतो, तेव्हा एकप्रकारे आपण समाज आणि देश घडवत असतो. याचे भान ठेवून आजच्या तरुणाईने स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे.

अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले की, आज तरुण आपल्या सोयीच्या परिघाबाहेर जाण्यास तयार नसतात. मात्र ही मानसिकता बदलली असता आज स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपण आपला सर्वांगीण विकास साधू शकतो. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक व्यवसाय संधी सुचवल्या तसेच कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल मराठी विभागाचे अभिनंदन केले.

यावेळी शिबिराच्या औचित्याने घेण्यात आलेल्या वादविवाद आणि निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्वयंरोजगाराशिवाय पर्याय नाही या विषयावर घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत तैबा बोरकर, मैत्रेयी बांदेकर यांनी प्रथम, ऐश्वर्या आचार्य, नारायणी शहाणे यांनी द्वितीय तर ऋषिकेश लांजेकर, अजिंक्य प्रभुदेसाई यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच उद्योजक व्हा या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत नम्रता शिंदे प्रथम, पूर्वा चुनेकर आणि समीक्षा पालशेतकर विभागून द्वितीय तर कोमल कांबळे तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. सर्व विजेत्यांना खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले.

यानंतर 4 सत्रांमध्ये झालेल्या स्वयंरोजगार शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. यातील पहिल्या सत्रात मँगो इव्हेंट्सचे अभिजित गोडबोले यांनी इव्हेंट मॅनेजमेंट याविषयी माहिती दिली. दुसऱ्या सत्रात कोकणातील फळप्रक्रिया : मूल्यवर्धन या विषयांतर्गत श्रीधर ओगले यांनी कोकणातील फळप्रक्रिया आणि त्यांचे मूल्यवर्धन, त्याद्वारे निर्माण होणाऱ्या रोजगार संधी याबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले. तिसऱ्या सत्रात स्वप्नपूर्ती इन्स्टिट्यूटच्या नीता माजगावकर यांनी मेकअप आणि हेअरस्टाईल याबाबत मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रांमध्ये आपला आवाज आपल्या स्वयंरोजगाराचे साधन कशाप्रकारे बनू शकतो याबाबत अभिनेत्री लतिका सावंत यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागवली. या स्वयंरोजगार शिबिरासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Swayamrojgar Programme
Swayamrojgar Programme
h
Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)