gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रा. प्रभाकर केतकर आणि श्री. सुधाकर जाधव यांचा सेवानिवृत्तीपर शुभेच्छा समारंभ संपन्न

Prof-Ketakr-and-Mr-Jadhav-Farewell-ceremony

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रदीर्घ काळ कार्यरत असणारे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. प्रभाकर केतकर आणि शिक्षकेतर कर्मचारी श्री. सुधाकर जाधव यांच्या सेवानिवृत्तीमिनित्त शुभेच्छा कार्यक्रम महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, सत्कारमूर्ती प्रा. केतकर आणि श्री. जाधव आणि प्रबंधक श्री. मोहन कांबळे उपस्थित होते.

प्रा. प्रभाकर केतकर यांनी पुणे विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. जून १९८० मध्ये ते महाविद्यालयाच्या कला शाखेत प्राध्यापक म्हणून रुजू झाले. प्राध्यापक, विभागप्रमुख, उपप्राचार्य अशा विविध भूमिका त्यांनी यशस्वीपणे बजावल्या. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी अनेक संस्था आणि संघटनांमध्ये महत्वाची पदे भूषविली. ३७ वर्षांच्या दीर्घ कालखंडात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. त्यांच्या शिक्षक ते मार्गदर्शक अशा विविध भूमिकांची ओळख कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी आपल्या मनोगतातून करून दिली.

तसेच यावेळी महाविद्यालयात १९८९ पासून सेवक म्हणून कार्यरत असणारे श्री. सुधाकर जाधव यांनाही सेवानिवृत्तीमिनित्त शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या प्रामाणिक सेवाभावी कार्याचा आढावा श्री. गौतम शिंदे आपल्या प्रास्ताविकातून घेतला. त्यानंतर प्रा. केतकर आणि श्री. जाधव यांचा महाविद्यालय आणि संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. केतकर यांनी सर्व महाविद्यालयाचे संस्थापक, संस्थाचालक, विद्यार्थी, प्राध्यापक यांच्याबद्धल कृतज्ञता व्यक्त केली. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनीही आपल्या मनोगतातून प्रा. केतकर आणि श्री. जाधव यांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तेजश्री भावे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.