gogate-college
priya-pednekar-win-price-in-student-parliament

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. प्रिया पेडणेकरला विद्यार्थी संसदेत परितोषिक

दरवर्षी मुंबई विद्यापीठाशी सलग्न असलेल्या महाविद्यालयातील युवा महोत्सवात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी कल्याण मंडळाच्यावतीने दिल्लीतील भारतीय संसदेच्या धर्तीवर ‘युवा विद्यार्थी संसद’ आयोजीत करण्यात येते. यंदा या विद्यार्थी संसदेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील कु. प्रिया पेडणेकर आणि बी.एम.एस. विभागातील कु. ऐश्वर्या ओसवाल यांची निवड झाली होती. स्पर्धेत १५५ विद्यार्थी सहभागी झाले होते.

कु. प्रिया हिने ‘विरोधी पक्षनेता’ या भूमिकेतून अभ्यासपूर्ण आणि संसदेत साजेसे वक्तृत्व आणि वाद-विवाद कौशल्याने युक्त असलेले भाषण सदर करीत कोकणच्या महाविद्लायाची एक वेगळी छाप या १४व्या युवा संसदेत उमटविली. तिने हिंदीतून भाषण सदर करीत द्वितीय पारितोषिक प्राप्त केले. दिल्लीच्या संसदेत जाऊन सदर पारितोषिक घेण्याची संधी या विजेतेपदामुळे तिला प्राप्त झाली आहे. ४९व्या युवा महोत्सवात हिंदी वक्तृत्व करून प्रियाने सुवर्णपदक पटकावले होते. तर कु. ऐश्वर्या हिने इंग्रजी वाद-विवादात रौप्य पदक पटकावले होते. तिनेही या संसदेत इंग्रजीतून भाषण सादर करून सहभाग घेतला होता.

कोकणातून देशपातळीवर आणि राज्य पातळीवर अनेक उत्तम संसदपटू निवडून गेले आहेत. त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. देश-राज्य पातळीवर अनेक महत्त्वाच्या मंत्रीपदापासून अनेक जबाबदाऱ्या कोकणातील नामवंतांनी निभावल्या आहेत. आजही कोकणच्या इतिहासात श्रीम. सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचे अध्यक्षस्थान भूषवित गौरवाचे आणि मनाचे स्थान प्राप्त केले आहे.

अशाप्रकारचे उत्तम संसदीय काम भविष्यात व्हावे आणि देश व राज्यांचा सर्वांगीण विकास साधावा त्यासाठी संसदेचा परिचय आणि संसदेचे संस्कार आजच्या विद्यार्थ्यांवर व्हावेत म्हणून मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे ‘युवा संसद’ हा उपक्रम राबविला जात आहे.

याप्रसंगी आगामी काळात गोगटे जोगळेकर महाविद्यालयातही अशी ‘विद्यार्थी परिषद’ भरविण्याचा आणि विद्यार्थ्यांवर संसदीय कामकाजाचे संस्कार करण्याचा मनोदय प्रियाचे अभिनंदन करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी व्यक्त केला.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)