gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात दि. २३ व २४ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि राजाराममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन, कलकत्ता (भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने कै. बाबुराव जोशी ग्रंथालयातर्फे दि. २३ व २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दोन दिवसीय ‘राज्यस्तरीय कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वीस वर्षांत ग्रंथालयातील बदल झपाटय़ाने झालेले आढळतात. हे बदल मुख्यत: आधुनिकीकरणाचे आहेत. ग्रंथालयाचे स्वरूप, कार्यपद्धती, सेवासुविधा, वाचन साहित्य आणि वाचकांच्या अपेक्षा यात महदंतर पडलेले जाणवते. तंत्रज्ञानाचा विशेषत: संगणकीय तंत्रज्ञानाचा प्रभाव छोटय़ा मोठय़ा साऱ्याच गोष्टींवर पडलेला दिसतो. बदललेल्या या साऱ्या कार्यपद्धतीला काळ, श्रम, पैसा आणि जागा यांचे निकष लावून तपासले तर या साऱ्या बदलांचे गांभीर्य सहज दिसून येते. ग्रंथालयाच्या आधुनिकीकरणात संगणकीय तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, यात शंकाच नाही. अनेक प्रकारची माहिती, सहस्र नोंदी आणि सुविधा यात एकसूत्रता आणणे सहजशक्य झाले. ग्रंथालयीन सेवक आणि वाचकांचेही श्रम, वेळ आणि पैसा वाचवून सेवा सुविधा तत्परतेने पुरविण्यात हातभार लावला. त्यामुळे बदलत्या काळाच्या आणि वाचकांच्या अपेक्षांना सामोरे जाण्यास ग्रंथालये सज्ज होऊ लागली. मात्र ग्रंथालयाच्या बाबतीत विविध खासगी सॉफ्टवेअर्स बाजारात एकामागून एक येऊन त्यांची स्वतंत्र संस्थाने निर्माण झाली. त्यांच्यात जरी स्पर्धा निर्माण झाली तरी या साऱ्यांमध्ये एकसूत्रीपणाचा अभाव होता. त्यामुळे ग्रंथपाल तसेच ग्रंथालये यात संभ्रम निर्माण होऊ लागला. किमतीमध्ये जशी विविधता आणि उंची असे तशी प्रमाणिकरणात मात्र नसे. ग्रंथालयांतील परस्पर सहकार्याच्या मूळ तत्त्वाला बाधा येऊ लागली. फायद्याच्या मागे लागल्याने ग्रंथपाल किंवा ग्रंथालये यांच्या गरजांची पर्वा खासगी कंपन्या करेनाशा झाल्या. नव्या सुधारित आवृत्तीची नवी अवाढव्य किंमत आणि नव्या सुधारणा जुन्या ग्राहकाला पुन्हा विकत घ्याव्या लागल्या. त्यामुळे पैसे विनाकारण पुन: पुन्हा खर्च करावे लागले आणि आर्थिक खर्चाचा नवा ताण ग्रंथालयावर पडू लागला. या आणि अशा अनेक समस्यांवर उत्तर म्हणून ओपन सोर्सकडे ग्रंथालय क्षेत्रातील व्यावसायिक आशेने बघू लागले आहेत.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या या दोन दिवसीय कार्यशाळेला तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या ग्रंथपाल डॉ. सुनिता बर्वे; गोखले इन्स्टिट्यूटचे ग्रंथपाल डॉ. नानाजी शेवाळे; श्री. संजय सकपाळ, ग्रंथपाल, बेडेकर कॉलेज, मुंबई इ. मार्गदर्शन करणार आहेत.

सदर या कार्यशाळेच्या निमित्ताने राज्यातील आणि विशेषतः कोकण विभागातील ग्रंथपालांना ‘कोहा आणि डीस्पेस’ ओपन सोर्स संगणक प्रणाली शिकण्याची उत्तम संधी प्रथमच उपलब्ध होत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड येथील महाविद्यालयीन आणि सार्वजनिक ग्रंथालयांतील ग्रंथपाल, कर्मचारी आणि ग्रंथालयशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांनी या कार्यशाळेकरिता आवर्जून उपस्थित राहावे आणि सदर कार्यशाळेबाबत अधिक माहितीकरिता प्र. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे (मोबा. ७९७२१७९४४२, email: baburaojoshilib@gmail.com) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.