gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये दि. ८ फेब्रुवारी २०१७ रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ फेब्रुवारी २०१७ रोजी सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. डॉ. विशाल भावे आणि रेश्मा पितळे हे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अभ्यासक कार्यशाळेकरिता मार्गदर्शन करणार आहेत. रत्नागिरीचे वनाधिकारी श्री. व्ही. जगताप हे वन विभागाच्या सागरी अधिवास व संवर्धनातील सहभागाबद्दल माहिती देणार आहेत. तर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य आणि जीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अरविंद कुलकर्णी त्यांच्या ‘मॅग्रूव्ह प्रकल्प’संदर्भातील विविध अनुभवांचे कथन करणार आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन हे स्थानिक लोकांच्या प्रयत्न आणि सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच आपल्या किनारपट्ट्याची ओळख व आंतरराष्ट्रीय कसोटी सूत्रे व त्या संदर्भातल्या घडामोडी विद्यार्थांना माहित होण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राला लाभलेला ७२० कि.मि.चा किनारा, तिथे असणारी जैवविविधता हा कायमच कुतूहलाचा विषय आहे. काही जुने संदर्भ सोडल्यास या दगडी अथवा वाळूच्या किनाऱ्यावरील किंवा खाजणाच्या जंगलात आढळणाऱ्या प्रजातीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. गेल्या काही वर्षात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही संस्था या किनाऱ्यांचा अभ्यास करत आहे. या अभ्यासामध्ये किनारपट्टीवरील विविध अधिवास आणि विशेषतः अपृष्ठवंशीय प्राण्यांमधील-शैवाल प्रजातीमधील विविधता प्रकर्षाने आढळून आली.

वाढती लोकसंख्या आणि प्रगतीच्या दृष्टिकोनातून कोकण किनारपट्टीवर येऊ घातलेले विविध प्रकल्प हे सगळेच येन केन प्रकारे या अधिवास व प्रजातींसाठी धोकादायक ठरत आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने ई.बी.एस.ए. हे आंतरराष्ट्रीय कसोटी सूत्रे साधन आपल्या महाष्ट्रामधून राबवून जैवशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचे किनारे शोधून काढले. ह्या प्रकल्पाचा अहवाल आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध माध्यमातून प्रस्तुतही करण्यात आला आहे.

किनारपट्टीच्या आसपास आणि विशेषतः जीवशास्त्र आणि पर्यावरण शास्त्राचा करणाऱ्या विद्यार्थांमध्ये जागृती आणि भविष्यात त्यांच्या संवर्धनाच्या कार्यात हातभार लागण्याच्या दृष्टीकोनातून ही कार्यशाळा गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेकरिता पर्यावरणप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)