gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘जागतिक पाणथळ दिन’ साजरा . ‘महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाणथळ क्षेत्राचे संवर्धन करावे’- मा. जिल्हाधिकारी

World Wetlands Day

गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी आणि ‘Ratnagiri district wetland brief documentation committee’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 02 फेब्रुवारी 2019 रोजी जागतिक पाणथळ दिनाचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री. सुनील चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी माननीय श्री. दत्तात्रय भडकवाड, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तहसीलदार वैशाली पाटील, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. विवेक भिडे, भूगोल विभाग प्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई इ. मान्यवर उपस्थित होते.
वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांनी प्रास्ताविक करताना पाणथळ दिनाची संकल्पना पाणथळ जागा व हवामान बदल अशी आहे असे सांगितले तसेच पाणथळ दिन साजरा करण्याची भूमिका स्पष्ट केली. महाविद्यालयाने पाणथळ दिनानिमित्त यापूर्वी घेतलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दि. 05 फेब्रुवारी 2019 रोजी ‘शीळ पाणथळ क्षेत्रभेट’ आयोजित केल्याचे सांगितले.या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा परिचय प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मधुरा मुकादम यांनी करून दिला.

माननीय जिल्हाधिकारी श्री. सुनील चव्हाण आपल्या व्याख्यानात असे म्हणाले, ‘कोकण हा जैवविविधतेने समृद्ध आहे. कोकणामध्ये अनेक पाणथळ जागा आहेत. या जैवविविधतेचा आणि पाणथळ जागांचा उपयोग जिल्हा प्रशासन पर्यटन विकासाच्या दृष्टीने करण्यासाठी पाऊले उचलत आहे. या विकासासाठी नागरिक, महाविद्यालयातील विद्यार्थी, संशोधक आणि विषयतज्ञ यांचा सहभाग मोलाचा ठरणार आहे.’ तसेच पाणथळ जागांचा अभ्यास आणि त्यांचे संवर्धन यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
माननीय निवासी उपजिल्हाधिकारी श्री दत्तात्रय भडकवाड यांनी पाणथळीची व्याख्या, त्यांचे प्रकार, वर्गीकरण, महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनातील प्रशासनाची भूमिका सादरीकरणाद्वारे अधिक विश्लेषणात्मक रित्या स्पष्ट केली. आपल्या जिल्ह्यात एकूण 62 पाणथळ जागांची माहिती संकलित करून ती शासन स्तरावर सादर करावयाचे आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हास्तरीय पाणथळ समन्वय समिती तसेच तालुकास्तरावर तालुकास्तरीय पाणथळ समन्वय समितीतयार करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील पाणथळ जागांची माहिती संकलित करण्यासाठी विशिष्ट कार्यपद्धती तयार केली आहे, अशी माहिती त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिली.

डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी या वर्षीच्या पाणथळ दिनाची संकल्पना विशद केली. पाणथळी हे हवामानाचे निदर्शक असून हवामान बदलामुळे जागतिक पातळीवर पाणथळींच्या स्थितीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पाणथळींच्या ठिकाणी असलेल्या सजीवांच्या प्रजातींमध्ये स्थित्यंतरे निर्माण होऊन परिसंस्थांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना आवाहन केले की त्यांनी हा विषय अभ्यासेतर प्रकल्पाच्या दृष्टीने राबवून आपल्या सभोवतालच्या परिसरातील विविध परिसंस्थांना आणि पाणथळ क्षेत्रांना भेटी देऊन त्याचा अहवाल आपल्या विभागाकडे सादर करावा.

प्रा. अंबादास रोडगे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली कदम यांनी केले. या कार्यक्रमात विज्ञान शाखेतील विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

World Wetlands Day
World Wetlands Day
World Wetlands Day
Comments are closed.