gogate-college-autonomous-logo

गो. जो. महाविद्यालय ‘झेप युवा महोत्सव २०१९’ द्वितीय वर्ष कला ‘महाराजा करंडक’चा मानकरी

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप-२०१९’ या सांस्कृतिक युवा महोत्सवाची सांगता दिलखेचक अशा ‘डान्स शो’ने झाली. या संपूर्ण सांस्कृतिक युवा महोत्सवादरम्यान उत्कृष्ट कार्यक्रम व्यवस्थापनासाठी दिला जाणारा तसेच मानाचा समजला जाणारा ‘महाराजा करंडक’ यावर्षी द्वितीय कला या वर्गाने पटकावला. महाराजा करंडकचे यंदाचे १५वे वर्ष आहे.

कोकणातील एक नामवंत महाविद्यालय म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात महाविद्यालयाचे एक आगळे-वेगळे स्थान आहे. त्या लौकिकाला साजेशा झेप सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. या सांस्कृतिक युवा महोत्सवात नृत्य, साहित्य, कला, वाङ्मय, अभिनय, विज्ञान-तंत्रज्ञान अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असते. या सर्व कार्यक्रमांमध्ये महाराजा करंडकाचे एक विशेष आणि मानाचे असे स्थान आहे. विद्यार्थ्यांच्या कार्यक्रम व्यवस्थापानाची स्पर्धा घेणारे गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे बहुधा महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे. या सांस्कृतिक युवा महोत्सवात उत्कृष्ट कार्यक्रम व्यवस्थापन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघाला १९९५ यावर्षीच्या माजी विद्यार्थ्यांनी पुरस्कृत केलेला महाराजा करंडक देण्यात येतो.

झेप या सांस्कृतिक युवा महोत्सवातील समारोपाचा कार्यक्रम म्हणजे खातू नाट्य मंदिर येथे पार पडलेला ‘डान्स शो’ होय. द्वितीय वर्ष कला या वर्गाने सदर कार्यक्रमाचे अत्यंत उत्कृष्ट आयोजन आणि व्यस्थापन करून महाराजा करंडकावर आपले नाव कोरले. व्यवस्थापन स्पर्धेतील द्वितीय क्रमांक द्वितीय वर्ष वाणिज्य या वर्गाने तर तृतीय क्रमांक द्वितीय वर्ष विज्ञान या वर्गाने पटकवला.

याप्रसंगी महाविद्यालयातील विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावर्षी उत्कृष्ट सूत्रसंचालनाचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे सागर पाटणकर, देवव्रत पवार आणि शुभम आंब्रे (विभागून) आणि शुभम शिवलकर आणि अपूर्वा आचार्य (विभागून) यांनी पटकावले.

या कार्यक्रमाला र. ए. सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, झेप समन्वयक प्रा. आनंद आंबेकर, माजी विद्यार्थी आणि महाराजा करंडक प्रायोजक श्री. बिपीन शिवलकर, श्री. राजेश जाधव, श्री. प्रशांत बापर्डेकर, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य विवेक भिडे, विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद जांगळे, इतर मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने तरुणाई उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आरती पोटफोडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. आनंद आंबेकर यांनी केले.

गो. जो. महाविद्यालय ‘झेप युवा महोत्सव २०१९’ द्वितीय वर्ष कला ‘महाराजा करंडक’चा मानकरी
Comments are closed.