gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी साजरा

‘राष्ट्रीय मतदार दिना’चे औचित्यसाधून जिल्हाधिकारी कार्यालय आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वादविवाद आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नुकतीच संपन्न झाली. नवमतदरांमध्ये मतदार प्रक्रियेसंदर्भात जनजागृती होऊन मतदान प्रक्रियेत त्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा अशा हेतूने भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रतिवर्षी देशभरात दि. २५ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वादविवाद आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या.

या स्पर्धाचे उद्घाटन उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या ‘आपल्या देशाला आतापर्यंत हिंदुस्थान, भारत, इंडिया असे ओळखले जायचे परंतु आता त्यात आणखी भर पडून यंगिस्तान या नावानेही आता संबोधले जात आहे. कारण भारत हा तरुणांचा देश आहे. भारतीय लोकशाहीची चर्चा विविध अंगांनी संपूर्ण जगभरात केली जाते. भारतात दिवसेंदिवस तरुण नवमतदारांच्या संख्येत वाढ होत असून नवमतदारांनी लोक प्रतिनिधींवर आपला विश्वास दाखवून योग्य प्रतिनिधींची निवड मतदानाच्या हक्काच्या माध्यमातून केली पाहिजे.’

महाविद्यालयातील मतदार साक्षरता क्लबचे समन्वयक आणि समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे यांनीही स्पर्धकांना भारतीय लोकशाही संदर्भात मार्गदर्शन करून स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त केल्या. गोगटे जोगळेकर महाविद्यालय जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने राबवित असलेला हा उपक्रम निश्चितच चांगला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील यांनी केले.

वादविवाद स्पर्धेकरिता १४ तर प्रश्नमंजुषा स्पर्धेकरिता १७ महाविद्यालयीन संघांनी सहभाग नोंदवला. वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक भारत शिक्षण मंडळ महाविद्यालय; द्वितीय क्रमांक गोगटे जोगळेकर महाविद्यालय तर तृतीय क्रमांक शासकीय अध्यापक महाविद्यालय विजेते ठरले. विजयी संघांना अनुक्रमे चार हजार, तीन हजार व दोन हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट वादविवादपटू फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाचा हृषीकेश डाळे ठरला; त्याणे रु. एक हजारचे पारितोषिक पटकावले.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली; द्वितीय क्रमांक राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबव; तर तृतीय क्रमांक लांजा महाविद्यालयाने पटकाविला. विजयी संघांना अनुक्रमे चार हजार, तीन हजार व दोन हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. वादविवाद स्पर्धेकरिता प्रा. वासुदेव आठल्ये आणि प्रा. कृष्णात खांडेकर यांनी तर प्रश्नमंजुषा स्पर्धेकरिता प्रा. तुळशीदास रोकडे आणि प्रा. अमोल सहस्रबुद्धे यांनी परीक्षणाचे काम पहिले. स्पर्धांच्या आयोजनाकरिता प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन तर उपप्राचार्य प्रा. विवेक भिडे,प्रा. जयंत अभ्यंकर आणि प्रा. साचिन सनगरे तसेच संगणकशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

दोन्ही स्पर्धांमध्ये विजेत्या संघांचे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री. सुनील चव्हाण, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणुक अधिकारी श्री. सुशांत बनसोडे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.