gogate-college-autonomous-logo

‘मतदानाच्या टक्केवारीने देशाच्या लोकशाहीचे भवितव्य सुनिश्चित होते’ -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

District Collector Sunil Chavan

‘भारतीय लोकशाहीला ७१ वर्षांची परंपरा असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतात लोकशाही व्यवस्था मुळ धरत होती. भारतात सुदृढ लोकशाही व्यवस्था टिकून राहण्याचे कारण म्हणजे निवडणुका होय. निवडणुका भारतीय लोकशाहीचा मुख्य कणा, आधार असून निवडणूक प्रक्रियेत प्रेत्येक भारतीय नागरिकाचा सहभाग असला पाहिजे’; असे प्रतिपादन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मान. सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग, मतदार साक्षरता क्लबच्या वतीने ‘मतदार साक्षरता आणि जनजागृती अभियानाचे’ आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मान. सुनील चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले, ‘स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही व्यवस्थेचा स्विकार केला. लोकशाही टिकवण्याचे निवडणुका हे महत्वाचे माध्यम आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांमध्ये मतदानाच्या माध्यमातून आले भविष्य शासनाकडे सुपूर्त करू. त्यामुळे निवडणूक मतदान प्रक्रियेपासून कोणताही पात्र मतदार वंचित राहता कामा नये; असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदारनोंदणी व जनजागृती करण्याचे आवाहन केले. शिक्षण क्षेत्राबरोबरच विद्यार्थ्यांनी अन्य क्षेत्रात प्रगती करण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले.

याप्रसंगी रत्नागिरीचे प्रांताधिकारी श्री. अमित शेडगे यांनी निवडणूक आयोग, निवडणूक यंत्रणा, निवडणुकाविषयक कायदे, ईव्हीएम व्होटिंग मशिन या विषयी तर उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. सुशांत बनसोडे यांनी ऑनलाईन मतदार नोंदणी संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी भावी मतदारांना खुले, नि:पक्षपाती मतदान करण्याची शपथ दिली. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ते म्हणाले, ‘महाविद्यालय राबवत असलेल्या विविध शैक्षणिक, सहशैक्षणिक, शिक्षणेतर अशा विविध उपक्रमांची माहिती देऊन महाविद्यालयाचे विविध क्षेत्रातील यश आणि योगदान विषद केले. गतवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी मतदारनोंदणी अर्ज भरण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन होत्या. विद्यार्थ्यांनी एक सुजाण, जागृत नागरिक होण्यासाठी प्रयत्न करावेत. जसे जसे आपण मोठे होत जातो तसतसे मतदानाची क्षमता वाढत जाते. आपण स्वत: मतदान करावेच परंतु इतरांनाही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यास प्रेरित करावे जेणेकरून त्यांनाही मतदान करता येईल. असे जेव्हा होईल तेव्हा जीवनातील एक कर्तव्य पूर्ण केल्याचे समाधान आपणास मिळेल, असे त्या पुढे म्हणाल्या.

यावेळी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पतीतोशिक प्राप्त कु. प्रिया पेडणेकर हिचा जिल्हाधिकारी मान. सुनील चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला रत्नागिरीचे तहसिलदार श्री. मच्छिंद्र सुकटे, नायब तहसिलदार (निवडणूक) श्री. संजय गमरे, मतदार साक्षरता क्लबचे समन्वयक प्रा. तुळशीदास रोकडे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य विवेक भिडे आदी शासकीय अधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. तुळशीदास रोकडे यांनी केले.

Comments are closed.