gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जीवशास्त्रविषयक व्याख्यानाचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे जीवशास्त्रविषयक व्याख्यानपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या व वक्त्या म्हणून पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था या नामांकित संस्थेत मार्गदर्शक सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अनुपमा हर्शल यांची उपस्थिती लाभली. यावेळी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद गोरे हे आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमास जैवतंत्रज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागांतील पदव्युत्तर विद्यार्थी यांची देखील उपस्थिती लाभली.

प्रमुख वक्त्यांनी याप्रसंगी बोलताना ‘मानव’ या संशोधन प्रकल्पाविषयी माहिती दिली. यामद्धे मानव प्रकल्प, यातील विद्यार्थ्यांचे योगदान तसेच शोधनिबंधांचे सुयोग्य प्रकारे वाचन इ. विषयांचा प्रामुख्याने समावेश होता. प्रमुख वक्त्यांनी कार्यक्रमादरम्यान उपस्थितांच्या सर्व शंखांचे निरसनही केले. तसेच विद्यार्थ्यांशी हितगुज करीत त्यांच्यातील संशोधन वृत्तीला चलना देण्यासाठी त्यांच्या संशोधनातील समस्या जाणून घेऊन त्यावर संभाव्य व पर्यायी उपाययोजनांवर भाष्य देखील केले. अशाप्रकारे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

सदर व्याख्यानपर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, शास्त्र शाखेचे उपप्राचार्य विवेक भिडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या सुयोग्य नियोजनासाठी जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. रश्मी भावे तसेच इतर प्राध्यापकवर्गाने विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सिद्धेश भागवत यांनी केले.

Comments are closed.