gogate-college-autonomous-logo

‘कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने मला अनेक पुस्तके वाचल्याचा आनंद घेता आला’ – प्रा. जयंत अभ्यंकर

‘आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने मला अनेक पुस्तके वाचल्याचा आनंद घेता आला. तुम्ही परीक्षण केलेली पुस्तके खूपच सुंदर असून माझ्याप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित अन्य श्रोत्यांनाही त्याचा निखळ आनंद घेता आला’; असे विधान प्रा. जयंत अभ्यंकर यांनी केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाच्या ‘वाचक गट’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, वाचन ही सतत आणि दीर्घकाळ आनंद देणारी गोष्ट असून आपण विविध साहित्यप्रकार आपल्या रुचीनुसार वाचले पाहिजेत. त्यातून आपल्याला ज्ञान आणि आनंद प्राप्त होईल. इतर कोणतीही गोष्ट तुम्हाला इतका आनंद देणार नाही; जितकी पुस्तके देतील. म्हणूनच ग्रंथ हेच गुरु असे वचन आहे. योग्य ग्रंथ योग्य वाचकाच्या हातात योग्य वेळी आला तर त्यातून ज्ञान, मार्ग आणि गती सापडेल. अनेक महान व्यक्तिमत्वांचे जीवन या ग्रंथांनी साकार आणि परिपूर्ण केले आहे. एक पुस्तक माणसाला घडवते. ग्रंथच मानवाच्या संपूर्ण जीवन प्रवासाला एक अर्थ प्राप्त करून देतात. आपल्या भाषणाच्या अखेरीस त्यांनी कार्यक्रमातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त करून विद्यार्थ्यांनी ‘वाचक गटाच्या’ माध्यमातून अशीच ज्ञानसाधना सुरु ठेवावी असे मत व्यक्त केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रा. जयंत अभ्यंकर, ग्रंथालय सेवा समितीच्या समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन, वाङ्मय मंडळाच्या समन्वयक प्रा. प्रणिता कुलकर्णी आणि ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी ग्रंथालयातील उपलब्ध सेवा-सुविधांचा आढावा घेतला. यावर्षी वाचक गट १८ वर्षांचा झाल्याचा उल्लेख करून वाचक गट या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या वाचनविषयक चळवळीचा मागोवा घेतला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. मंगल पटवर्धन यांनी वाचन प्रक्रिया ही सतत चालणारी प्रक्रिया असून आपण काय वाचले ते इतरांना सांगणे आणि इतरांनी काय वाचले ते जाणून घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. आपली आवड आणि उपलब्ध वेळ यांचा समन्वय साधून प्रत्येकाने अभ्यासाबरोबरच उत्तम पुस्तके वाचली पाहिजेत जी तुम्हाला खूप आनंद मिळवून देतील आणि आयुष्याला मार्गदर्शक ठरतील. महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात तुम्हाला हे सर्व मिळेल असा विश्वास व्यक्त केला; आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उत्पल वाकडे यांनी तर आभारप्रदर्शन कु. नेत्रा केळकर यांनी केले.

यानंतर ‘पुस्तक परीक्षण’ सादरीकरणास प्रारंभ झाला. वरिष्ठ महाविद्यालयातील कला, विज्ञान, वाणिज्य या विभागातील आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. मुसाफिर, बिंब प्रतिबिंब, स्मृतिचित्रे, गोदान, मन में है विश्वास, माझे तालमय जीवन, नटसम्राट, त्रिज्या, मु.पो. आई, व्यक्ती आणि वल्ली, तोत्तोचान, हमरस्ता नाकारताना, तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात, लपवलेल्या काचा या प्रसिद्ध पुस्तकांचे परीक्षण सादर केले. सिद्धी साळवी, हृषीकेश आचार्य, श्रद्धा हळदणकर, सोनाली पाटील, वैष्णवी पाटील, प्रसन्न खानविलकर, आदिती कर्लेकर, सेजल पेजे, शाहिन हिटनळी, नेत्रा केळकर, सिद्धी जोग, साहिल आलीम, रिद्धी मुळ्ये, गौरी भटसाळसकर यांनी वरील लेखकांच्या प्रसिध्द ग्रंथ कलाकृतींचा आपल्या शैलीत मागोवा घेतला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी मार्गदर्शन केले. वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गौरी भटसाळसकर आणि कु. सेजल पेजे यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

h
h
h
Comments are closed.