gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शीळ पाणथळ क्षेत्रभेट

Wetland Day

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि रत्नागिरी जिल्हा पाणथळ क्षेत्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ‘जागतिक पाणथळ दिन’ साजरा करण्यात आला. यावर्षीच्या जागतिक पाणथळ दिनाची संकल्पना ‘पाणथळ जागा व हवामान बदल’ अशी असून या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शीळ येथील पाणथळ क्षेत्राला अभ्यास भेट देण्यात आली.

इराणमधील रामसार येथे दि. २ फेब्रुवारी १९७१ रोजी भरलेल्या परिषदेत एक ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे जगभरात ‘जागतिक पाणथळ दिन’ साजरा केला जातो. या ठरावानुसार जगभरातील पाणथळ असलेल्या विविध जागांना संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी केलेल्या व्याख्येनुसार; ‘चिखल, दलदल, पालापाचोळा साचलेले पाणी, साठवलेले, वाहते, ताजे, मचूळ अथवा खारे, सहा फुटांपेक्षा कमी जागेत शिरणारे समुद्राचे पाणी, नद्यांमुळे, तयार झालेले त्रिभुजप्रदेश व अशा विविध प्रकारच्या जलाशयांचा पाणथळ जागेमध्ये समावेश करण्यात येतो.

बगळे, बदके, करकोचे, खंड्या तसेच शिकारी प्रजातीच्या इतर अनेक पक्ष्यांचा वावर पाणथळ प्रदेशात होतो. भाताची खाचरे आणि मस्त्य उत्पादनासाठी बनवलेली तळी यांचा देखील पाणथळ जागांमध्ये समावेश होतो, यातून मानवाला देखील अन्न मिळते. त्यामुळे अशा जमिनीकडे वाया गेलेली जमीन अथवा कचरा टाकण्याची जागा म्हणून न पाहता जैवविविधतेचा आणि पर्यावरण साखळीचा एक महत्वाचा दुवा म्हणून पहिले पाहिजे; याकरिता व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पाणथळ दिनानीमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

पाणथळ जागा टिकविण्याचे महत्व आणि जगभरातील या दिशेने होणारे कार्य याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य आणि जागृती करण्याच्या हेतूने दि. ५ फेब्रुवारी २०१९ रोजी शीळ या पाणथळ क्षेत्राला भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी ऐन, किंजळ, अर्जुन, आपटा, हरडा, कुंभा, दगडफूल अशा वनस्पतींच्या सुमारे बेचाळीस प्रजातींचे निरीक्षण केले. तसेच सरडा, दयाळ, पाकोळ्या, सीगल, चोपई, मधमाशा, घार, समुद्र पक्षी, चतुर, बगळे व विविधरंगी फुलपाखरे या पाणथळ परिसरात आढळून आली.

सदर क्षेत्रभेटीमद्धे द्वितीय आणि तृतीय वर्षातील विज्ञान शाखेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या भेटीमद्धे विद्यार्थ्यांनी शीळ धरण जलक्षेत्राच्या आसपासच्या परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास केला. क्षेत्रभेटीमध्ये डॉ. अमित मिरगल, प्रा. ऋतुजा गोडबोले, प्रा. कश्मिरा राऊत, प्रा. मोहिनी बामणे, प्रा. मयुरेश देव सहभागी झाले होते. सदर अभ्यास भेटीभेटीकरिता विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. शरद आपटे यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ‘शीळ पाणथळ क्षेत्रभेट’
पाणथळ दिन निसर्ग सहल-विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. शरद आपटे
Comments are closed.