gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात भारताचा ७९वा प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर राष्ट्रीय छात्र सेनेच्या भूदल आणि नौदलाच्या छात्रांनी शानदार संचालन करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. याप्रसंगी प्राध्यापक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर गणित, माहितीतंत्रज्ञान आणि महिला विकास कक्षातर्फे तयार करण्यात आलेल्या विविध माहितीपर भित्तीपत्रकांचे अनावरण प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर राधाबाई शेट्ये सभागृहात पुरस्कार आणि पारितोषिक वितरण सोहोळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालय शाळासमितीचे अध्यक्ष श्री. उल्हास लांजेकर, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, उपप्राचार्य प्रा. विवेक भिडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुशील वाघधरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावर्षीचा वरिष्ठ महाविद्यालयाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ डॉ. अतुल यशवंत पित्रे यांना, कानिष्ठ महाविद्यालयाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रा. प्रकाश रघुनाथ दीक्षित यांना तर ‘आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार’ श्री. दीपक तुकाराम जोशी यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, रोख रक्कम आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाच्यावतीने देण्यात येणारा ‘आदर्श शिक्षक वाचक-ग्रंथरत्न सन्मान’ वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. सीमा राजेश वीर यांना तर ‘आदर्श विद्यार्थी वाचक-ग्रंथरत्न सन्मान’वरिष्ठ महाविद्याल्याकरिता कु. शुभराणी शिवदास होरंबे (प्रथम वर्ष कला) हिला आणि कनिष्ठ महाविद्यालायाकरिता विश्वजीत जितेंद्र सागवेकर (बारावी कला) याला मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप एक ग्रंथ, प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ असे होते. त्यानंतर शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला.

त्यानंतर अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘सहकार’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप’ सांस्कृतिक युवामहोत्सवाच्या अल्बमचेही अनावरण करण्यात आले. सहकारच्या मुद्रक आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सौ. जान्हवी गणपुले, ‘झेप’ सांस्कृतिक युवामहोत्सवाकरिता फोटोग्राफी करणारे परेश राजीवले यांचाही सत्कार करण्यात आला.

गुणगौरवप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी नैपुण्यप्राप्त विद्यार्थी आणि शिक्षकांचे विशेष कौतुक केले. महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करत असून त्यांनी विविध स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त करून एक आदर्श निर्माण केला आहे; असे सांगून महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक उल्लेखनीय कामगिरीचा आपल्या ओघवत्या शैलीत आढावा घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया टोळ्ये यांनी केले. सदर कार्यक्रमाला प्राध्यापक, अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Republic Day 2019
Comments are closed.