gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे ‘राष्ट्रीय सेवा योजना शिबीर’ उत्साहात संपन्न

विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक, मुल्याधिष्टीत सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ५०वे वर्ष आणि स्वर्गीय महात्मा गांधी यांची १५०वी जयंती असे औचित्य विद्यमान वर्षीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी शिबिरास लाभले. विद्यापीठीय शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्याने आपल्या भोवतालची सामाजिक परिस्थिती अभ्यासावी, समाजाच्या गरजा, अडचणी आणि समस्या समजून घ्याव्यात व जनहिताची कामे करावीत अशी महात्मा गांधींची अपेक्षा होती. त्यासाठी खेड्यापाड्यांतून विद्यार्थ्यांना जाण्याची संधी प्राप्त व्हावी म्हणून या विशेष निवासी शिबिराची योजना खेड्यांमध्ये करण्यात यावी अशी त्यांनी सुचविले होते. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन १९५९-६० दरम्यान डॉ. सी.डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सेवा समितीची स्थापना करण्यात आली. तर २४ सप्टेंबर १९६९ रोजी संयुक्त शिक्षण मंत्रालयाच्या डॉ. राव यांनी भारतातील ३७ विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना केली. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे त्यापैकीच एक होय.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ५६वे शिबीर महाविद्यालयाच्या २०व्या दत्तक गावात म्हणजे चांदेराई येथे संपन्न झाले. सदर शिबिराला राष्ट्रीय सेवा योजनेचे १५० स्वयंसेवक नोंदविण्यात आले. शिबिराचा कालावधी १६ नोव्हें. ते २२ नोव्हें. असा होता. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, चांदेराई गावच्या सरपंच सौ. शिल्पा दळी, माजी सरपंच श्री. संयोग दळी, उमरे हायस्कूलचे मुख्याध्यापिक श्री. महेश गांगण, गावचे पोलीस पाटील, अनेक ग्रामस्थ, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाधिकारी डॉ. सोनाली कदम यांनी शिबिराचे महत्व आणि ग्रामीण विकासात विद्यार्थ्यांचे योगदान विषद केले. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी शिबिराला शुभेच्छा व्यक्त करताना शिबिरार्थीकडून असलेल्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांना मिळणारा व्यक्तिमत्व विकासाचा लाभ याबाबत आपले विचार मांडले. श्रमदानाचे महत्व विषद करताना शिबिरातील प्रत्येक कार्यक्रम विद्यार्थ्यांना एक नवीन दृष्टी देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

या शिबिराला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थांना विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. यामध्ये श्री. विनोद वायंगणकर यांनी ‘वैज्ञानिक दृष्टीकोन आणि डॉ. मयूर देसाई यांनी दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले. सामाजिक जनगृतीकरिता पथनाट्य हा उत्तम पर्याय आहे. याचे प्रभावी सादरीकरण कसे करावे याविषयी श्री. सुरेंद्र जाधव यांनी कार्यशाळा घेतली. कृषी पर्यटन रोजगार, मार्शल आर्ट, राष्ट्रीय छात्र सेना, संघटन कौशल्य, सामाजिक संवेदनशीलता, श्रमसंस्काराचे महत्व या विषयांवर अनुक्रमे कृषी अधिकारी श्री. ठाकरे, श्री. सुरज बने, प्रा. अरुण यादव, श्री. नितीन कानविंदे, सौ. दीप्ती कानविंदे, श्री. उदय लोध, प्रा. प्रभात कोकजे यांनी मार्गदर्शन केले. इंटरनेट आणि अध्यापन पद्धतीविषयी माहिती प्रा. प्रशांत लोंढे, प्रा. सचिन सनगरे, डॉ. उमेश संकपाळ, डॉ. रुपेश सावंत यांनी दिली. ‘भावी जीवनाची वाटचाल’ या विषयावर
अ‍ॅड.संध्या सुखटणकर यांनी मार्गदर्शन केले. माजी आमदार श्री. सुरेंद्र तथा बाळासाहेब माने यांनी ‘माजी स्वयंसेवकाशी हितगुज व मुलाखत’ विषयांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर श्री. श्रीवल्लभ साठे यांनी ‘कातळ शिल्पांचा’ परिचय करून दिला. महिला मेळाव्याला ‘महिला विकास कक्षाच्या’ डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रा. हर्षदा पटवर्धन आणि प्रा. आतिका राजवाडकर यांनी मार्गदर्शन केले.

श्रमदान करून विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन व जलशक्ती अभियान अंतर्गर्त चांदेराई पुल-इब्राहीमपट्टण विभाग, शिंदेवाडी व डोंगरवाडी येथे बंधारा तयार केला. तसेच विहीर सफाई, पाणलोट क्षेत्र स्वच्छता, स्मशानभूमी स्वच्छता, प्लास्टिक मुक्त अभियान, परिसर स्वच्छता, पायवाट तयार करणे, रंगकाम, आनंदशाळा उपक्रम इ. प्रमुख श्रमदानाची व किकासाची कामे केली. शेतकरी मेळावा, महिला मेळावा, हळदीकुंकू इ. सामाजिक उपक्रम. स्वयंरोजगार मार्गदर्शन, आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम असे इतर कार्यक्रम शिबिरादरम्यान संपन्न झाले.
विद्यमानवर्षीचा मनाचा असा ‘कै. प्रा. संजय जोशी पुरस्कार’ समीर विवेक शिंदे याने पटकवला. या कार्यक्रमाला आजी-माजी स्वयंसेवक उपस्थित होते. त्यांनी प्रा. संजय जोशी यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
शिबिराच्या समारोपप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे यांची उपस्थिती लाभली. स्वत: माजी स्वयंसेवक असल्याने त्यांनी आपल्या जीवनातील राष्ट्रीय सेवा योजनेने दिलेले योगदान विषद केले आणि आपले अनेक अनुभवाचे कथन केले व विद्यार्थ्यांना उत्तम कामासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. जिल्हा परिषेदेचे ज्येष्ठ नेते श्री. उदयजी बने यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. गावचे माजी सरपंच श्री. संज्योग दळी यांनी शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या शिस्तीचे विशेष कौतुक करून त्यांनी केलेल्या श्रमदानाने चांदेराई गावाकरिता जलसंवर्धनाचे जे काम उभे राहिले आहे त्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाधिकारी डॉ. सोनाली कदम यांनी संपूर्ण शिबिराचे अहवाल वाचन केले. सूत्रसंचालन प्रा. शिवाजी उकरंडे यांनी तर अभारप्रदर्शन प्रा. दानिश गनी यांनी केले. सदर शिबिराला सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments are closed.