gogate-college-autonomous-logo

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागाची राजापूर तालुक्यातील ऐतिहासिक ठिकाणांना क्षेत्रभेट

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील इतिहास विभागाने राजापूर तालुक्यातील प्रागैतिहासिक आणि मध्ययुगीन काळातील स्थानांना क्षेत्रभेट दिली.

प्राचीन मानवाच्या कलेचा कोकणातील नमुना म्हणजे कातळशिल्पे होय. रुंढे, बारसू आणि देवाचे गोठणे येथील कातळशिल्पांना यावेळी भेटी देण्यात आल्या. रुंढे येथील वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्पे तसेच बारसू येथील तारवाच्या सड्यावरील विविध कातळशिल्पे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. तारवाच्या सड्याच्या जैवविविधतेविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. या कातळशिल्पांबद्दल श्री. सुधीर रिसबूड आणि श्री. धनंजय मराठे यांनी मार्गदर्शन केले. तसेच देवाचे गोठणे येथील रावणाचा सडा येथील ‘चुंबकीय विस्थापन’ याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

मध्ययुगीन काळातील ऐतिहासिक महत्त्व लाभलेले देवाचे गोठणे येथील भार्गवरामाच्या मंदिरालाही विद्यार्थ्यांनी भेट दिली. या मंदिराची पेशवेकालीन स्थापत्यशैली, त्याचे महत्त्व, तेथील पोर्तुगीज घंटा याविषयी डॉ. सचिन जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महत्त्व असलेला नाटे येथील घेरा यशवंतगड येथे भेट दिली. किल्ल्याचा इतिहास, बांधकाम, त्याचे ऐतिहासिक महत्त्व याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. येथील ‘उपळ्या बुरुज’ हा दुर्मिळ असलेला बांधकामाचा नमुना याविषयी माहिती देण्यात आली. यशवंतगडाविषयी डॉ. सचिन जोशी यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

या क्षेत्रभेटीला महाविद्यालयातील इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे १४ आणि अभ्यंकर कुलकर्णी महाविद्यालयाचे ३४ असे एकूण ४८ विद्यार्थी सहभागी होते. प्रा. पंकज घाटे आणि प्रा. निनाद तेंडुलकर यांनी या क्षेत्रभेटीचे संयोजन केले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी या क्षेत्रभेटीच्या नियोजन संदर्भात सर्वांना मार्गदर्शन केले.

Comments are closed.