gogate-college

प्रा. श्रीधर शेंड्ये यांना गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील भूगोल विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. श्रीधर विनायक शेंड्ये यांचे नुकतेच निधन झाले. महाविद्यालयाच्या ज. शं. केळकर सभागृहात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रा. शेंड्ये हे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात १९६४ साली रुजू झाले. सुमारे ३१ वर्षे प्रदीर्घ सेवा करून १९९५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. आपल्या कार्यकाळात त्याने भूगोल आणि ग्रामीण विकास विषयाचे विभागप्रमुख, कला शाखेचे उपप्राचार्य तसेच अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक म्हणूनही त्यांनी काम पहिले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सभासद मंडळाच्या अध्यक्ष पदाबरोबरच विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष, नियामक मंडळाचे सदस्य म्हणूनही मोलाच्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे त्यांनी पार पडल्या. शिस्तबद्ध कामाचा ध्यास घेतलेल्या प्रा. शेंड्ये यांनी शेकडो शिस्तप्रिय विद्यार्थी घडविले.

प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी प्रा. शेंड्ये यांच्या स्मृतींना उजाळा देताना सांगितले की, मुंबईसारख्या ठिकाणी आपले शिक्षण पूर्ण करूनही त्यांनी कार्याच्या बाबतीत रत्नागिरीसारखा दुर्गम प्रदेश निवडून शिक्षण विस्ताराचे कार्य अखंडपणे पार पाडले. विषयावरील प्रभुत्व, ज्ञानाची खोली, चिकित्सक विश्लेषण, कठोर आणि शिस्तप्रिय शिक्षक असा लौकिक प्राप्त केला. क्षेत्रअभ्यासाची विशेष रुची असलेले प्रा. शेंड्ये दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन करीत असत. नवनियुक्त शिक्षकांसाठी ते ज्ञानाचा अमोल खजिना होते. त्यामुळे ते विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कायम स्मरणात राहतील.

प्रा. शेंड्ये यांच्या निधनाने आपण एका हुशार, जिज्ञासू, हरहुन्नरी, समाजाभिमुख व्यक्तित्वाला मुकलो आहोत, असे प्राचार्यांनी नमूद केले. या श्रद्धांजली सभेला महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed.