gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जगप्रसिद्ध सिरम इन्स्टीट्युटमध्ये निवड : कोविशिल्डच्या निर्मितीत खारीचा वाटा

रत्नागिरीतील प्रथितयश र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यातील विद्यार्थ्यांनी पर्यायाने कोकणच्या मातीतील गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. कोकणच्या शैक्षणिक जडणघडणीत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा नेहमीचा मोलाचा वाटा राहिला आहे. सलग्नीत शाळा, महाविद्यालये इ.च्या यशामधून नेहमीचा हे प्रतीत होत असते. या यशस्वी वाटचालीचा एक भाग म्हणून नुकतेच महाविद्यालयातील पदव्युत्तर बायोटेक्नॉलॉजी आणि मायाक्रोबायोलॉजी विभागातील ०९ विद्यार्थ्यांची पुणेस्थित जगप्रसिद्ध सिरम इन्स्टीट्युटमध्ये निवड झाली आहे.

अश्विन सावंत, चिन्मय कुलकर्णी, अमोल जोशी, केदार मुळ्ये, सुधांशू पलांडे, सुवेल पावरी, स्वप्नील शिंदे, प्रकाश चव्हाण आणि कृष्णा मोरे या विद्यार्थ्यांची अत्यंत कठीण अशा निवड प्रक्रियेतून निवड झाली आहे. आता ते सिरम संस्थेच्या क्वालिटी अॅश्युरन्स आणि प्रोडक्शन विभागात ट्रेनी ऑफिसर्स म्हणून रुजू झाले आहेत.

या निवड प्रक्रियेत सिरम संस्थेच्या एच.आर. विभागाचे श्री. भूषण आपटे तसेच महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत, डॉ. उमेश संकपाळ, विभागप्रमुख डॉ. नितीन पोद्दार, प्रा. रश्मी भावे यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. या संपूर्ण निवड प्रक्रियेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

संस्थेचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि प्राध्यापकांनी नोंदवलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचेही कौतुक केले.

Comments are closed.